छत्तीसगडमध्ये काँग्रेसऐवजी बंडखोर काँग्रेस नेते अजित जोगी यांच्याशी युती करण्याचा बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांचा निर्णय किंवा भारिप बहुजन महासंघ-एमआयएमची आघाडी वा काँग्रेस आघाडीबाबत प्रकाश आंबेडकर यांची भूमिका लक्षात घेता आंबेडकर आणि मायावती यांची भूमिका भाजपच्या पथ्यावरच पडेल, अशी लक्षणे आहेत.
भाजपच्या विरोधात सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि कैराना लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये विरोधी पक्ष एकत्र आल्याने भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. समाजवादी पक्ष आणि बसपा हे पारंपरिक विरोध एकत्र आल्याने विरोधकांना हे यश मिळाले होते. हा प्रयोग यशस्वी झाल्याने लोकसभा निवडणुकीतही सर्व समविचारी पक्षांची महाआघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सारे प्रयत्न सुरू असतानाच मायावती यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीकरिता अजित जोगी यांच्या पक्षाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय जाहीर केला. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस-बसपा युतीचे प्रयत्न सुरू असताना मायावती यांनी जोगी यांच्याशी युती केल्याने त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे.
या दोन पक्षांमध्ये होणारे मतविभाजन भाजपच्या फायद्याचे ठरणार आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत आघाडीत चांगल्या जागा वाटय़ाला आल्या नाहीत तर स्वबळावर लढण्याचा इशारा मायावती यांनी दिला आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसने बसपाशी आघाडीसाठी चर्चा सुरू केली असतानाच मायावती यांनी २२ जागांवर उमेदवार जाहीर केले. हे सारे आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचा मायावती यांचा प्रयत्न असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
शरद पवार- प्रकाश आंबेडकर यांचे परस्परांना आव्हान
महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांनी सामील व्हावे म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असतानाच आंबेडकर आणि ओवेसी यांच्या युतीची घोषणा करण्यात आली. काँग्रेसबरोबर आघाडीस तयार, पण राष्ट्रवादी नको अशी भूमिका आंबेडकर यांनी घेतली. तसेच शरद पवार निधर्मवादी, पण राष्ट्रवादी नाही, असेही सांगितले. यावरून आंबेडकर यांची पावले वेगळ्या दिशेने पडत असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी निधर्मवादी नाही तर अकोला मतदारसंघात दोन निवडणुकांमध्ये आंबेडकर यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा कसा चालला, असा सवाल राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केला.
‘भाजपला मदत करण्याचा प्रश्नच नाही’
भाजपला मदत होईल अशी कोणतीही खेळी आपल्याकडून होणार नाही. आतापर्यंतच्या राजकारणात तसे कदापि केलेले नाही. माझ्यावर तशी टीका करणाऱ्यांची पाश्र्वभूमी तपासून घेणे आवश्यक आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेसबरोबर आघाडीस आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.