राज्यात स्वतंत्र बौद्ध विवाह कायद्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी देशात समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी अखिल भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार आणि भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
१९५६ नंतर ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्यांना हिंदु विवाह कायदाच लागू आहे. परिणामी बौद्ध संस्कार पद्धतीने झालेले काही विवाह न्यायालयात अवैध ठरले आहेत. त्यामुळे बौद्धांसाठी स्वतंत्र विवाह कायदा करावा, अशी मागणी बौद्ध समाजातील काही नेते व संघटनांनी केली आहे. त्यानुसार शासकीय स्तरावर त्याबाबत हालचाली सुरु आहेत. अलीकडेच या संदर्भात सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके यांनी संबंधित विभागाची बैठक घेतली होती. त्यात बौद्ध विवाह कायद्याच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली.
देशात विशेष विवाह कायदाही आहे. त्या अंतर्गत सर्वच धर्मातील लोकांना विवाह नोंदणी करता येते. त्यामुळे बौद्धांसाठी स्वतंत्र कायद्याची गरज नाही, असे आंबेडकर म्हणाले. किंबहुना रविवारी मुंबईत होणाऱ्या बौद्ध महासभेच्या अधिवेशनात या प्रस्तावाला विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा