वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माबाबत महत्त्वाचं विधान केलंय. समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकालच वाचून दाखवला आणि त्यानुसार समीर वानखेडे जे म्हणत आहेत ते बरोबर असल्याचं सांगितलं. समीर वानखेडे यांनी १८ वर्षे पूर्ण झाल्यावर वडिलांनी स्विकारलेला मुस्लीम धर्म न स्विकारता वडिलोपार्जित हिंदू धर्म स्विकारल्याचं जाहीर केलंय, असंही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्विकारला आणि नंतर समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी वयात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित धर्माचं असल्याचं जाहीर केलं. यांसदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे. सर्व लोकांच्या माहितीसाठी मी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल वाचून दाखवतो. सिव्हिल नंबर ७०६५/२००८ हा निकाल २६ फेब्रुवारी २००५ रोजी न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि गौवडा जी यांनी दिलाय.”

“वयात आल्यानंतर मुस्लीम धर्म स्विकारलेला नाही असं समीर वानखेडे यांचं म्हणणं”

“सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानुसार समीर वानखेडे यांचं म्हणणं बरोबर आहे. सध्या वानखडे यांचं प्रकरणी जातपडताळणी समितीकडे गेलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या त्या प्रकरणातील पक्षकार पाहिले तर के. पी. मन्नू विरुद्ध जातपडताळणी समिती अशाच आहेत. त्यामुळे माझ्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्विकारला असला तरी मी वयात आल्यानंतर तो स्विकारलेला नाही हे समीर वानखेडे यांचं म्हणणं बरोबर आहे,” असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

“पालक म्हणून आई-वडिलांनी जे केलंय ते मुलाला लागू होतं असं नाही”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “१८ वर्षांचा होईपर्यंत कुठलंही मुल आपल्या आई-बापाच्या ताब्यात असतो. त्यामुळे पालक म्हणून आई-वडिलांनी केलंय ते त्या मुलाला लागू होतं असं नाही. त्या मुलाला स्वतंत्र राहण्याचा अधिकार असतो. म्हणून समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माबाबतचा उपस्थित केलेला मुद्दा या निकालात पूर्णपणे समाविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल देखील याच संदर्भात होता.”

“सर्वोच्च न्यायालयाने मुलाचं वडिलोपार्जित धर्माचं म्हणणं ग्राह्य धरलं”

“या प्रकरणात वडिलांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला परंतू मुलाने वडिलोपार्जित धर्म स्विकारला. त्यामुळे त्या मुलाने तो मादिगा आहे असं म्हटलं. तसेच त्याचं प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाचा निकाल मुलाच्या विरोधात लागला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मुलाचं वडिलोपार्जित धर्माचं म्हणणं ग्राह्य धरलं. तसेच मुलाचं जात पडताळणी प्रमाणपत्र मान्य केलं,” असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : शाळा सोडल्याच्या वानखेडेंच्या दाखल्यावर मुस्लीम नोंद; नवाब मलिकांनी सादर केला दाखला

“याच निकालात सर्वोच्च न्यायालयाने कुळ हा शब्द वापरलाय. तसेच त्या कुळातून मुलाला बाहेर काढलं गेलं नाही. त्यामुळे कुळानुसार मुलाला वडिलोपार्जित जात मिळते असं म्हटलंय. समीर वानखेडे यांच्याबाबत वर्तमानपत्रांमधून मी जे वाचतोय ते प्रकरण असंच आहे असं वाटतंय. त्यामुळे समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र रद्द होईल असं वाटत नाही,” असंही आंबेडकर यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar quote supreme court judgement whether sameer wankhede hindu or muslim pbs