आगामी विधानसभा निवडणुका भारिप-बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने लढविल्या जातील, अशी माहिती महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. राज्य सरकारने आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा प्रयत्न होता. परंतु काँग्रेसने फारसे स्वारस्य दाखविले नाही, चर्चाही गांभीर्याने केली नाही, त्यामुळे आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला होता. २३-२४ लहान पक्ष, संघटनांना एकत्र करुन महाराष्ट्र लोकशाही आघाडीची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीत स्वत आंबेडकर पराभूत झाले, आघाडीची कामगिरीही अदखलपात्र ठरली. मात्र विधानसभा निवडणुकाही आघाडीच्या वतीनेच लढविण्याची त्यांनी तयारी केली आहे.
विधानसभा निवडणुका आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी उद्या रविवारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्याची शक्यता त्यांनी लोकसत्ताशी बोलताना फेटाळून लावली. लोकशाही आघाडी या नावानेच स्वतंत्रपणे निवडणुका लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या विविध प्रश्नांवर २२ ऑगस्टला मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातील धनगर समाजाची अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीचे आंबेडकर यांनी समर्थन केले. अर्थात आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हा प्रश्न सोडविता येतो, त्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत, याचा अभ्यास करुन सरकारने हा विषय गांभीर्याने हाताळावा, असे आवाहन त्यांनी केले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा