मुंबई : अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’मुळे ‘महाविकास आघाडी’च्या २० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यात राष्ट्रवादीचे (शरद पवार) ८, काँग्रेस६, शिवसेनेच्या (ठाकरे) ६ आणि एमआयएमच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत असलेल्या ‘लाडक्या बहिणी’च्या लाटेतही लोकसभेला मिळालेला मतांचा वाटा राखण्यात ‘वंचित’ आघाडी यशस्वी ठरली आहे.
‘वंचित’ने विधानसभेच्या २०० जागा लढवल्या होत्या. १९४ मतदारसंघांत उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. एका मतदारसंघात दुसऱ्या तर ५८ मतदारसंघांत ‘वंचित’चे उमेदवार तिसऱ्या स्थानी आहेत.
तीन टक्क्यांवर मते
‘वंचित’ला एकूण १४ लाख २२ हजार मते मिळाली (३.१ टक्के). मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ला १५ लाख ८२ हजार (३.६ टक्के) मते मिळाली होती. अल्पसंख्याकबहुल मतदारसंघात ‘वंचित’ने या वेळी मुस्लीम उमेदवार उभे केले होते. परिणामी, पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष असलेल्या ‘एमआयएम’ला त्याचा फटका बसला. या पक्षाचे ‘औरंगाबाद मध्य’चे इम्तियाज जलील आणि आणि ‘औरंगाबाद पूर्व’चे सिद्दीकी नसुरीद्दीन तकुद्दीन हे दोन उमेदवार पराभूत झाले. आंबेडकर यांनी या वेळी जागावाटपात आणि निवडणूक प्रचारात ‘बौद्ध, मुस्लीम-ओबीसी’ समीकरण केले होते.
राज्यात ‘अनुसूचित जाती’ची ११ टक्के लोकसंख्या असून या विधानसभेला सहा आघाड्यांमधील १४ आंबेडकरी पक्षांनी ६७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र. यामध्ये एकमेव ‘वंचित’ने स्वबळावर दखलपात्र कामगिरी केली. उत्तर प्रदेशच्या मायावती यांच्या ‘बहुजन समाज पक्षा’ने सर्वाधिक २३७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते, मात्र बसपला या वेळी केवळ ०.४८ टक्के मतांवर समाधान मानावे लागले.
कुणाला धक्का तर कुणाला फायदा..
‘वंचित’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप नाईक, सतीश चव्हाण, राजेश टोपे, राहुल मोटे, राजेंद्र शिंगणे, फहाद अहमद यांचा काठावर पराभव झाला. काँग्रेसचे वसंत पुरके, दिलीप सानंद, धीरज देशमुख यांना नेत्यांना अल्प मतांनी पराभव स्वीकाराला लागला. ‘वंचित’ने दलित व मुस्लीम मते घेतल्याने भाजपचे अतुल सावे, मंदा म्हात्रे, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर, रमेश कराड या उमेदवारांना निसटता विजय मिळवता आला. तर शिवसेनेचे (शिंदे ) संजय गायकवाड आणि तानाजी सावंत या चर्चित उमेदवारांचा वंचित उमेदवारांनी विजय सुकर केला.