आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसबरोबर युती करण्याची प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघाने तयारी केली आहे. या संदर्भात स्वत: आंबेडकर व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. परंतु युतीला लवकरात लवकर मूर्त स्वरूप देण्याच्या दृष्टीने काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने भारिपच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे.
राज्यात गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व काही महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस व भारिप-बहुजन महासंघाची युती झाली होती. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये ही युती कायम राहावी, अशी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची इच्छा होती. त्यानुसार वरिष्ठ स्तरावर चर्चेच्या एक-दोन फेऱ्या पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. अर्थात आम्ही काँग्रेसच्या फार मागे लागणार नाही, सन्मान्य समझोता झाला तर ठीक, अन्यथा स्वबळावर किंवा तिसरी आघाडी उभी करून निवडणुका लढविण्याची पक्षाची तयारी आहे, असे भारिपच्या एका नेत्याने सांगितले.
१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्रित रिपब्लिकन पक्षाने एकत्रित काँग्रेसबरोबर युती केली होती. त्यावेळी शिवसेना-भाजपचा पार सफाया झाला होता. आरपीआयचेही प्रकाश आंबेडकर, रा.सू. गवई, रामदास आठवले व जोगेंद्र कवाडे हे चार नेते निवडून आले होते. १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून सवतासुभा मांडला. त्याचवेळी आरपीआयमध्येही फूट पडली आणि आंबेडकर व आठवले असे दोन गट अस्तित्वात आले. त्यावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबर, तर आठवले यांनी राष्ट्रवादीबरोबर युती केली होती. राष्ट्रवादीबरोबरच्या युतीचा आठवले यांना एकटय़ालाच लोकसभेवर निवडून जाण्यास फायदा झाला. परंतु काँग्रेसबरोबर समझोता करणारे आंबेडकर स्वत:ही निवडून आले व त्यांचे तीन आमदारही विधानसभेत निवडून गेले. प्रकाश आंबेडकरांबरोबरच्या युतीचा काँग्रेसलाही फायदा झाला होता. त्यानंतरच्या २००४ व २००९ च्या निवडणुकांमध्ये मात्र काँग्रेस-भारिपचा समझोता होऊ शकला नाही. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पुन्हा या दोन पक्षांमध्ये युती करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. परंतु काँग्रेसकडून युतीला मूर्त रूप देण्याबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल भारिपमध्ये नाराजी आहे.  

Story img Loader