काँग्रेसने केवळ प्रसारमाध्यमातून निवडणूक समझोत्याची भाषा करायला सुरुवात केली आहे, त्यांच्या या लहरीपणावर भारिप-बुहजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर नाराज आहेत. काँग्रेसला फारसे महत्व न देता त्यांनी राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. दिल्लीत आज, बुधवारी डावे पक्ष, समाजवादी पक्ष, जनता दल, अण्णा द्रमुक व इतर समविचारी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीस आंबेडकर उपस्थित राहणार आहेत.
गेल्या आठवडय़ात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करण्याचे जाहीर वक्तव्य केले. त्याचे आंबेडकर यांनी स्वागत केले. परंतु गेल्या दीड वर्षांपासून युतीबाबत काहीच निर्णय काँग्रेसने घेतला नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर युतीची भाषा केली जाते, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दुसरे असे की भारिप-बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात २३ पक्ष-संघटनांची लोकशाही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. काँग्रेसने आघाडीशी चर्चा करावी, अशी भूमिका आता भारिपने घेतली आहे. तसे पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीचे सदस्य आमदार हरिदास भदे, प्रा. अविनाश डोळस व आमदार बळीराम शिरस्कर यांनी १९ ऑक्टोबरला माणिकराव ठाकरे यांना पत्र दिले होते. त्याचेही अजून उत्तर आलेले नाही, असे पक्षाच्या प्रवक्तया डॉ. उज्वला जाधव यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसला फार महत्व द्यायचे नाही, असा एकंदरीत भारिपचा सूर आहे. त्याऐवजी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप शिवेसनेला पर्यायी आघाडी स्थापन करण्यात आली आहे, आता राष्ट्रीय स्तरावर उभ्या राहणाऱ्या तिसऱ्या आघाडीत सहभागी व्हावे, असे भारिपचा कल आहे. त्यानुसार प्रकाश आंबेडकर बैठकीला उपस्थित राहणार आहेत, पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी ज. वि. पवार यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीत जाणार
काँग्रेसने केवळ प्रसारमाध्यमातून निवडणूक समझोत्याची भाषा करायला सुरुवात केली आहे, त्यांच्या या लहरीपणावर भारिप-बुहजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर नाराज आहेत.
First published on: 30-10-2013 at 12:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar will make third front