आठवडय़ाची मुलाखत : प्रकाश बोरगावकर, हेल्पएज इंडिया या ज्येष्ठ नागरिकांवरील संघटनेचे संचालक

वयाची साठी उलटली की मुला-नातवांमध्ये रमून आपले उरलेले आयुष्य आनंदी राहून व्यतीत करण्याचे स्वप्न प्रत्येक ज्येष्ठ व्यक्ती आपल्या उराशी बाळगून असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत ज्येष्ठांचे हे स्वप्न हमखासच पूर्ण होत होते. मात्र, हल्ली बदलेला काळ व जीवनशैली यातून आयुष्याच्या संध्याकाळी या स्वप्नभंगाचे ढग ज्येष्ठांच्या आयुष्यावर एकवटू लागले आहेत. हल्ली अनेक ज्येष्ठांना कुटुंबाकडून अपमान, पोटच्या मुलांचे दुर्लक्ष यामुळे एकटे राहण्याची पाळी आली आहे. त्यामुळे ‘वंशाचा दिवा’ असो की, ‘म्हातारपणाची काठी’ असो या कौटुंबिक संकल्पनांचे संदर्भ बदलले असून कौटुंबिक उदासीनता ही ज्येष्ठांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत आहे. तसेच, त्यांच्या आरोग्याच्या व आर्थिक कुवतीच्या समस्याही गंभीर होऊ लागल्या आहेत. एकंदर सरकारदरबारी ज्येष्ठांबद्दलच्या धोरणात उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे सरकारदरबारी परवड तर कुटुंबीयांकडून उपेक्षा याने ज्येष्ठ निराधार होऊ लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर ज्येष्ठांच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक समस्यांवर गेली ३८ वर्षे काम करणाऱ्या ‘हेल्पएज इंडिया’ या संस्थेचे संचालक प्रकाश बोरगावकर यांच्याशी ‘लोकसत्ता मुंबई’ने केलेली ही खास बातचीत.

* ज्येष्ठांचे मनोबल खच्चीकरण होण्यामागचे कारण काय?
ज्येष्ठांच्या लोकसंख्येत वाढ झाली असून ही वाढ ८० पेक्षा अधिक आर्युमान असलेल्या व्यक्तींची झाली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठांचा आकडा हा १ कोटी २६ लाख असून यापैकी जवळपास ४० टक्के ज्येष्ठ एकटे राहतात. हा एकटेपणा या ज्येष्ठांच्या मुळावर उठत असून त्यांची मनोवस्था या काळात बिकट होते. त्यातच वृद्धत्वामुळे जे काही उत्पन्न असते त्यातील ६५ टक्के खर्च हा केवळ आरोग्यावर होतो. याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे भारतातील ९० टक्के ज्येष्ठ नागरिकांकडे निवृत्तिवेतन नसून ६० वयानंतर आरोग्याचा विमा ज्येष्ठांना उतरवता येत नाही. त्यामुळे अनेकांना उतारवयात रोजगारासाठी प्रयत्न करावे लागतात.

* ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्या गंभीर झाल्यात, काय सांगाल?
हल्ली ज्येष्ठांमध्ये रक्तदाब, मधूमेह, हृदयविकार, मोतीबिंदू, डिमेन्शिया, अल्जायमर, पार्किन्सन आदी आजार वाढीस प्रामुख्याने वाढू लागले आहेत, ज्यांच्यासाठी होणारा खर्चदेखील अधिक आहे. यातील मानसिक आजारांबाबत जागृती नसल्याने अनेक जण या आजारांकडे वृद्ध काळातला विसराळूपणा म्हणून दुर्लक्ष करतात. खाजगी डॉक्टरांचे दर वाढले असून औषधांच्याही किमती वाढल्या आहेत. तसेच, हल्ली आरोग्यासाठी अनेक चाचण्याही कराव्या लागत असल्याने आरोग्यावर जास्त खर्च करावा लागतो. सरकारी रुग्णालयांमध्ये ज्येष्ठांसाठी वेगळ्या रांगा नसल्याने त्यांना वाट पाहावी लागते, याने त्यांना त्रास होतो. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार कमी दरात होत नसून सरकारकडून आर्थिक मदतही होत नाही.

* हल्ली ज्येष्ठांची सामाजिक सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसते.
आमच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ज्येष्ठांची ७८ टक्के मानहानी ही युवकांकडूनच म्हणजे मुलगा व सूनेकडून केली जाते. मुले त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करतात. तसेच, अनेक मुले परदेशी शिक्षणासाठी जातात व तेथेच स्थायिक होतात. घरी पैसे पाठवतात, मात्र परतत नाहीत. त्यांची वाट पाहण्यात अनेकांचे दिवस निघून जातात. या काळात घरातील नोकरांवर अवलंबून रहावे लागते, याचा नोकर अथवा तत्सम मंडळी गैरफायदा घेतात आणि त्यांची लूट अथवा त्यांच्यावर हल्ले करतात.

* वृद्धाश्रमांची सद्याची परिस्थिती काय आहे?
वृद्धाश्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मागणी सध्या वाढत आहे. खरे, तर एकटय़ा वृद्धांसाठी वृद्धाश्रम असणे अपेक्षित असताना मुलेच आई-वडिलांना वृद्धाश्रमात आणून सोडतात किंवा मुलांच्या जाचाला कंटाळून वृद्ध स्वत:हून आश्रमात येतात. पैसे द्या आणि राहा तत्त्वावर किंवा चॅरिटेबल संस्थांकडून चालवणारे वृद्धाश्रम सध्या आपल्या इथे आहेत. दोन हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत पैसै घेणारे हे वृद्धाश्रम आहेत. यात मोफत सेवा देणाऱ्या वृद्धाश्रमांची संख्या ही कमी होत आहे. तसेच, आजारी वृद्धांना हल्ली वृद्धाश्रमात प्रवेश देण्यात येत नाही. त्यातच, वृद्धाश्रमांची प्रतीक्षा यादीसुद्घा वाढताना दिसत असून चांगल्या समाजासाठी हे लक्षण ठीक नाही.

* सरकारची ज्येष्ठांबाबत भूमिका काय?
१९९९ साल हे आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ व्यक्ती वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते. या वेळी आमच्या ‘हेल्पएज इंडिया’ या संस्थेसह अन्य सामाजिक संस्थांनी केंद्र शासनाला ज्येष्ठ नागरिक धोरणाचा मसुदा दिला होता. मात्र, या धोरणाची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. तसेच, १ ऑक्टोबर २०१३ ला राज्याचे धोरण जाहीर झाले. या धोरणाच्या निर्मितीतील समिती सदस्यांपैकी मी एक होतो. मात्र, जे धोरण राज्याला दिले त्यापेक्षा प्रत्यक्षात धोरण वेगळे मंजूर झाले. आम्ही दिलेली ज्येष्ठांची व्याख्या बदलण्यात आली. तसेच, या धोरणात आर्थिक तरतूदही करण्यात आलेली नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धोरणाचा शासन निर्णयही अद्याप करण्यात आला नसून ज्येष्ठांचे वय ६५ वरून ६० केल्याचा शासन निर्णयही करण्यात आलेला नाही.

* ‘हेल्पएज इंडिया’चे ज्येष्ठांसाठी नेमके काय कार्य चालते?
‘हेल्पएज इंडिया’ ही ज्येष्ठांसाठी १९७८ पासून कार्यरत आहे. ज्येष्ठांना सन्मान मिळवून देणे व ज्येष्ठांच्या समस्यांवर कार्यक्रम राबवणे हे संस्थेचे मूळ उद्देश आहेत. यासाठी आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांमध्ये जागृती करतो असून जागृतीपर कार्यक्रम व कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात. ज्येष्ठांच्या समस्यांवर आम्ही ‘मोबाइल मेडिकल युनिट’ चालवतो. यात एका रुग्णवाहिकेत एक डॉक्टर, नर्स, सामाजिक कार्यकर्ता सेवेसाठी उपलब्ध असतात. अशा तब्बल ११० रुग्णवाहिका देशात कार्यरत आहेत. आजवर संस्थेने ४० हजाराच्या आसपास मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच, ग्रामीण भाग, झोपडपट्टय़ा या ठिकाणी जाऊन आम्ही सरकारच्या ज्येष्ठांबद्दल असलेल्या योजनांबद्दल माहिती देतो व ज्येष्ठांच्या समस्यांचा सरकारदरबारी पाठपुरावा. करतो. ज्येष्ठांच्या कोणत्याही समस्यांसाठी आम्ही १८००-१८०१२५३ या क्रमाकांची हेल्पलाइन चालवतो.

 

मुलाखत : संकेत सबनीस

Story img Loader