छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीची मोहीमच भाजपने उघडल्याचा आरोप शिवसेनेकडून सातत्याने केला जात असतानाच, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्याने विरोधकांना आयते कोलितच मिळाले. अखेर आमदार लाड यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.आमदार लाड यांच्या वक्तव्याचा निषेध करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लाड यांच्या वक्तव्याची चित्रफीतच प्रसारित केली. ‘दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वत:च्या आमदारांना धडे द्या’ असा टोमणा राष्ट्रवादीने भाजपला हाणला आहे.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदनामीचा घाट भाजपने घातला आहे. महाराष्ट्रातील जनता हे कदापि सहन करणार नाही. काँग्रेस पक्षदेखील सहन करणार नाही, असे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलायची यांची लायकी नाही. भारतीय जनता पक्षाने इतिहास मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का?, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.विरोधकांनी जोरदार समाचार घेतल्याने लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. समाजमाध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करणाऱ्या लाड यांना सपशेल माफी मागावी लागली.