भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी सोमवारी (१३ जून) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. “माझी आणि राज ठाकरे यांची कौटुंबिक मैत्री आहे. उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि उद्या ते कोणालाही भेटणार नसल्याने आज भेटलो,” अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली.

प्रसाद लाड म्हणाले, “माझी आणि राज ठाकरे यांची कौटुंबिक मैत्री आहे. उद्या त्यांचा वाढदिवस आहे. उद्या ते कोणालाही भेटणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे मी आज राज ठाकरेंना भेटलो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूस केली. ही एक सदिच्छा भेट होती.”

या भेटीत राज ठाकरेंसोबत विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत काही चर्चा झाली का असाही प्रश्न प्रसाद लाड यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “कौटुंबिक मैत्री म्हटलं की त्यात राजकीय चर्चा न झालेल्या चांगल्या असतात. मात्र, राज ठाकरे मला मदत करतील याची निश्चित खात्री आहे.”

विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत बोलताना प्रसाद लाड म्हणाले, “आम्ही सहाच्या सहा जागा लढू अशी आतापर्यंत तरी परिस्थिती आहे. सदाभाऊ खोत यांचा अपक्ष अर्ज असला तरी तो भाजपा पुरस्कृत आहे. आम्हाला खात्री आहे की राज्यसभा निवडणुकीनंतर आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता, सर्व अपक्ष व छोट्या पक्षांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेला विश्वास निश्चितपणे या सरकारला अल्पमतात आणण्याइतकं मतदान भाजपा आणि पुरस्कृत उमेदवारांना मिळेल.”

हेही वाचा : “…म्हणून मी १४ जूनला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला”, पुण्याच्या सभेचा उल्लेख करत राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

“संपूर्ण सरकार अपयशी आहे. ते जगातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून घेतात आणि स्वतःच्याच आमदारांना विश्वासात घ्यायला मुख्यमंत्री कमी पडले आहेत,” असा आरोपही प्रसाद लाड यांनी केला.

Story img Loader