ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) आणि दूरदर्शन या दोन्ही महत्त्वाच्या शासकीय प्रसार यंत्रणांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘प्रसारभारती’मध्ये हजारो पदे रिक्त असल्याच्या बातम्या वारंवार आल्यानंतर अखेर ‘प्रसारभारती’ला जाग आली आहे. सप्टेंबर १९९७ मध्ये स्थापना झाल्यापासून अद्यापही न भरल्या गेलेल्या १ हजार १६६ पदांसाठी प्रसारभारतीने जाहिरात दिली असून यात कार्यक्रम प्रबंधक, निर्मिती सहाय्यक आणि कार्यधिकारी या जागांचा समावेश आहे.
मुंबई आणि देशभरातील रिक्त पदांबाबत ‘लोकसत्ता’ने दिलेल्या बातमीनंतर या विषयावर संसदेतही चर्चा झाली होती. त्यानंतर आता ही पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ एप्रिल असून स्टाफ सिलेक्शन कमिटीने घेतलेल्या मुलाखतींनंतर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सरकारने १ हजार १५० जागा भरल्या होत्या. मात्र यंदा त्यापेक्षा १६ जास्त जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आकाशवाणीमध्ये देशभरात ‘अ’ वर्ग अधिकाऱ्यांपैकी १३६२ पदे, ‘ब’ वर्ग कर्मचाऱ्यांपैकी १५८४ पदे, ‘क’ वर्गातील ४८६३ पदे आणि ‘ड’ वर्गातील २२७२ पदे रिक्त आहेत. तर दूरदर्शनमध्ये ही संख्या अनुक्रमे ७२४, ११४०, २८७१ आणि १४५१ एवढी आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्या देशभरातील एकत्रित कर्मचाऱ्यांची संख्या ४८ हजार २२ एवढी असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात सध्या केवळ ३३ हजार ८०० कर्मचारीच कार्यरत आहे. परिणामी दोन्ही माध्यमांमधील तब्बल १४ हजार २२२ पदे रिक्त आहेत.या रिक्त पदांमुळे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कार्यक्रमांना फटका बसला आहे.

Story img Loader