मराठी रंगभूमीवरील सदाबहार अभिनेते प्रशांत दामले यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे शुक्रवारी दुपारी अंधेरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दामले यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अस्वस्थ वाटू लागल्याने दामले यांना क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऍंजिओग्राफी केल्यानंतर दामले यांच्या ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱया वाहिन्यांमध्ये चार ब्लॉकेज असल्याचे आढळले. त्यापैकी एक ब्लॉकेजवर शुक्रवारीच ऍंजिओप्लास्टी करण्यात येईल. आणखी एका ब्लॉकेजसाठी मंगळवारी दुसरी ऍंजिओप्लास्टी करण्यात येईल. उर्वरित दोन ब्लॉकेजवर औषधोपचार करण्यात येणार आहेत.
दामले यांना डॉक्टरांनी सध्या पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. ‘एका लग्नाची गोष्ट’ या त्यांच्या नाटकाचे दादर आणि डोंबिवलीत आज होणारे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.