उपवास धार्मिक कारणांसाठी करावा की वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून हा वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. उपवास करण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात; परंतु आहारसंहितेबाबत साधम्र्य जरूर असतं. उपवासाच्या दिवशी सात्त्विक पदार्थ खावेत, असं म्हटलं जातं. त्यामध्ये अर्थातच नॉनव्हेज पदार्थ कुठेच बसत नाहीत; पण फास्टफूड पदार्थाचीही वर्णी लागत नाही. अशा वेळी कुणी तरी उपवासाला चालणारे फास्टफूड पदार्थ तयार केले असतील तर? होय, तुम्ही बरोबर वाचलंत. मुलुंडच्या ‘अचिजा’ हॉटेलचे मालक मंगल भानुशाली यांनी हा प्रयोग केला आहे. मंगल यांनी उपवासासाठी चालणारा फास्टफूडचा केवळ एक पदार्थ तयार केला नसून तब्बल आठ वेगवेगळ्या पदार्थाची ट्रीट मुंबईकरांसाठी आणली आहे.
लखमसीभाई बुट्टावाला यांनी १९९० साली घाटकोपरच्या टिळक रोडवर सुरू केलेल्या ‘अचिजा’ या हॉटेलची पावभाजी मुंबईकरांना चांगलीच परिचित आहे. वडिलोपार्जित व्यवसायाला पुढे नेत त्यांचा मुलगा मंगल भानुशाली यांनी आठ वर्षांपूर्वी मुलुंडकरांनाही ‘अचिजा’च्या पावभाजीची गोडी लावली आणि आता मुलगी ख्याती आणि तपनच्या रूपाने तिसरी पिढीही याच व्यवसायात उतरली आहे. पाच वर्षांपूर्वी मंगलभाई गुजरातमधील कच्छला गेले असताना त्यांनी पहिल्यांदा तिथे ‘फराळी पावभाजी’ हा प्रकार खाल्ला. मंगलभाई स्वत: मुंबईतील प्रसिद्ध पावभाजीचे निर्माते असल्याने त्यांची उत्सुकता चाळवली गेली आणि त्यांनी दीड महिना गावी राहून त्या पावभाजीचं गुपित जाणून घेतलं.
भाजी तर सहज तयार होण्यासारखी होती; पण त्यांना केवळ तिथवरच थांबायचं नव्हतं. त्यांना भाजीसोबतच पावावरही प्रयोग करायचा होता. गेली दोन वर्षे त्यांना हे जमत नव्हतं; पण या वर्षी तब्बल दोन आठवडे दिवस-रात्र राबल्यानंतर त्यांच्या या अनोख्या प्रयत्नाला यश आलं. मुंबईत पहिल्यांदाच मंगल यांनी उपवासाचा पाव तयार केला आहे. त्यातूनच तयार झाले आहेत फास्टफूडचे आठ वेगवेगळे फराळी प्रकार. फराळी पाव भाजी, मसाला पाव, खडा पाव भाजी, पाव सँडविच, पिझ्झा, ड्रायफ्रूट कचोरी, पापडी चाट आणि शेव पुरी.
शिंगाडा, साबुदाणा आणि राजगिराचं पिठी, दूध आणि बटरचा वापर करून हा उपवासाचा पाव तयार करण्यात आलेला आहे. याच पिठाचा वापर करून पिझ्झाचा ब्रेड आणि शेवपुरीच्या पुऱ्याही बनवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे सर्व फास्टफूड पदार्थ आता उपवासाच्या काळातही खाता येणार आहेत.
फराळी पावभाजी तयार करताना भाजीमध्ये केवळ बटाटा, टोमॅटो आणि ‘अचिजा’चा खास पारंपरिक पद्धतीने तयार केलेला पावभाजी मसाला वापरण्यात येतो. तब्बल छत्तीस आयुर्वेदिक मसाल्यांचा वापर करून हा मसाला तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे नेहमीच्या पावभाजीपेक्षा कमी भाज्या यामध्ये वापरल्या जात असल्या तरी मसाल्याच्या वापरामुळे त्याच्या चवीला अजिबात धक्का पोहोचत नाही. पावभाजीत कुठेच कांदा, लसूण किंवा आल्याचाही वापर केला जात नाही, एवढंच नव्हे तर पावभाजी सव्र्ह करतानाही बारीक चिरलेला कांदा न देता सोबत केवळ टोमॅटोचे काप, लिंबाची फोड आणि अर्थातच उपवासाचे पाव दिले जातात.
फराळी पिझ्झाचा बेस उपवासाच्या पावाचाच आहे. पिझ्झासाठी तयार केलेल्या स्पेशल सॉसमध्येही कांदा, लसूण आणि आल्याचा समावेश नाही. शिवाय ब्रेडवर फिलिंग म्हणून केवळ बारीक चिरलेला टोमॅटो, सिमला मिरची आणि उकडलेला बटाटा एवढंच टाकून त्यावर भरपूर चीज किसून टाकलं जातं. नेमकेच पदार्थ असले तरी इतर ठिकाणी मिळणाऱ्या पिझ्झापेक्षा हा पिझ्झा नक्कीच चविष्ट आहे. इथला आणखीन एक अफलातून पदार्थ म्हणजे ‘पाव सँडविच’. तापलेल्या तव्यावर भरपूर बटर घेऊन त्यामध्ये पावभाजीच्या मसाल्याचा मारा केला जातो. मसाला चांगला गरम झाल्यावर त्यात ‘उपवासाचा पाव’ आणि टोमॅटो आणि उकडलेल्या बटाटय़ाच्या चकत्या परतवून घेतल्या जातात. त्यानंतर पावामध्ये टोमॅटो आणि बटाटय़ाच्या चकत्या एकावर एक रचून त्याला सँडविचसारखं कट करून सव्र्ह केलं जातं. चमचमीत आणि चवदार असा हा प्रकार आहे.
दहीपापडी चाटमध्ये तीन प्रकारच्या पापडी असतात. बटाटा वेफर्स, पापडी, साबुदाण्याचा चिवडा, उकडलेला बटाटा, गोड चटणी, त्यावर अतिशय क्रीमी दही आणि शेवटी शेव, डाळिंबाचे दाणे यांची पखरण करून हे चाट तुमच्या पुढय़ातच सादर केलं जातं. शेवपुरीच्या पुऱ्यादेखील फराळी पावाच्या पिठापासूनच तयार केलेल्या आहेत. त्यावर केवळ बटाटा आणि गोड चटणी टाकली जाते. वरून मसाला शेंगदाणे, सळईचा आणि बटाटय़ाचा चिवडा पेरलेला असतो. ड्रायफ्रूट कचोरीचं आवरण ‘उपवासाच्या पावाचं’ असून आतमध्ये काजू आणि मनुक्यांचं सारण असतं.
आजच्या लाइफस्टाइलमध्ये जंकफूड हे अडचणीचे ठरत असताना ‘अचिजा’चा हा प्रयोग चवदार आणि आरोग्यास चांगला म्हणावा असाच आहे.
अचिजा
* कुठे? – मिरानी नगर, हिरा मोंघी हॉस्पिटलच्या समोर, गणेश गावडे रोड, मुलुंड (पश्चिम)
* कधी? – सोमवार ते रविवार दुपारी १.३० ते रात्री १ वाजेपर्यंत.
nanawareprashant@gmail.com
@nprashant