ठाणे महापलिका क्षेत्रातील काही ठराविक बिल्डरांची मोठी अनधिकृत बांधकामे दंड आकारुन विकसित करण्याचा सपाटा महापालिकेच्या शहरविकास विभागाने लावला असून ही बांधकामे विकसित करताना शहरविकास विभाग मोठा भ्रष्टाचार करत आहे, असा सनसनाटी आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
तसेच शहरातील काही हॉटेल मालकांची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मोठय़ा रकमेची मागणी केली जात असून शहरविकास विभागातील कोटय़ावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.
शहरातील अनेक अनधिकृत बांधकामे राजीव यांच्या काळात अधिकृत होत असल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.