ठाणे पालिका नगररचना विभाग कार्यालयाच्या सुशोभिकरणासाठी झालेल्या खर्चावरून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त आर. ए. राजीव यांना न्यायालयात खेचले आहे. राजीव यांनी हा खर्च बिल्डरकडून वसूल करून सरकारी नोकरदार असतानाही गैरप्रकार केल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून चौकशीचेही आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे.
राजीव यांनी सुशोभिकरणाचे काम हाती घेतले. मात्र त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद नव्हती. त्याचा खर्च पालिकेनेही दिला नव्हता. हा खर्च महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीने (एमसीएचआय) केल्याचा राजीव यांचा दावा होता. ‘एमसीएचआय’ने मात्र त्याचा लेखी इन्कार केला आहे. तेव्हा हे पैसे बिल्डरकडूनच आल्याचा संशय असून त्यासाठीच राजीव यांची चौकशी करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.