घोडबंदर मार्गावरील विहंग व्हॅली या गृहसंकुलास अवैधपणे पाणीपुरवठा होत असल्याच्या आरोपावरून अडचणीत सापडलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्यावर पाणीचोरीचा आरोप केला आहे. बदलापूर येथील सागांव परिसरात राजीव यांनी बांधलेल्या फार्म हाऊसला शेजारून वाहणाऱ्या नदीतून चोरून पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. या फार्म हाऊससाठी आदिवासींच्या जागेत अवैधपणे रस्ता उभारण्यात आल्याचा आरोप करीत यासंबंधीची एक चित्रफीत त्यांनी पत्रकारांना दाखवली. दरम्यान, सरनाईक यांच्याविरोधात कठोर कारवाई केल्याचा राग ठेवून ते आपल्यावर खोटे आरोप करीत आहेत, अशी प्रतिक्रिया राजीव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सरनाईक यांनी बांधलेल्या गृहसंकुलास अवैधपणे पाणीपुरवठा होत असल्याचा ठपका ठेवत ठाणे महापालिकेने मध्यंतरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सरनाईक यांच्या विहंग इन हॉटेलमध्ये तसेच त्यांच्या काही गृहसंकुलात झालेल्या अतिक्रमणासंबंधी एक सविस्तर अहवाल राजीव यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. तेव्हापासून सरनाईक आणि राजीव यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. ठाणे महापालिकेत आयुक्त म्हणून राजीव यांना येत्या २५ मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत असून २९ एप्रिलपासून ते महिनाभराच्या रजेवर जात आहेत. त्यामुळे राजीव यांची ठाणे महापालिकेतील कारकीर्द संपुष्टात आल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
बदलापूर येथील सागांव परिसरात नदीकिनारी बांधलेल्या फार्म हाऊसला चोरून पाणीपुरवठा होत असल्याची चित्रफीत सरनाईक यांनी पत्रकारांना दाखविली. सरनाईक यांनी राजीव यांच्या बदलापुरातील या फार्म हाऊसविषयी माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती दिली. राजीव शेतकरी नसताना त्यांना आदिवासी जमिनीची खरेदी कशी केली, असा सवाल सरनाईक यांनी केला. या फार्म हाऊसला जाण्यासाठी आदिवासी जमिनीत रस्ता बांधण्यात आला आहे. त्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्यात आलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला. अवैधपणे उभारण्यात आलेल्या रस्त्याची चित्रफीतही त्यांनी या वेळी पत्रकारांसमोर सादर केली. नदीतून थेट पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सरनाईक यांनी केलेल्या आरोपांचे राजीव यांनी खंडन केले आहे.

Story img Loader