राज्याचे माजी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे सोमवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून प्रतापसिंह यांच्यावर उपचार सुरू होते. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले. अखेर प्रतापसिंह यांची सोमवारी दुपारी प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी आठ वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मोहिते-पाटील घराण्यात राजकीय कलह सुरू झाल्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील हे माढा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे होते. परंतु, त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. धवलसिंह यांनी स्वत:चे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची १९८५ साली युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदापासून राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली होती. त्यानंतर प्रतापसिंह यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सोलपूरमधून लोकसभेवर देखील ते निवडून आले होते. तर, युती सरकारच्या काळात भाजपच्या कळपात दाखल होऊन प्रतापसिंह मोहिते-पाटील राज्याचे सहकार मंत्री राहिले होते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
सहकार क्षेत्राची मोठी हानी – मुख्यमंत्री
प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शोक व्यक्त केला.
शोकसंदेशात फडणवीस म्हणतात, मोहिते पाटील यांनी अगदी तरूण वयापासूनच शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याला सुरूवात केली. शिक्षण क्षेत्रासोबत क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी लक्षणीय कार्य केले. राज्यात सर्वप्रथम विद्यार्थी विमा योजना त्यांनी लागू केली. तसेच सोलापूर जिल्ह्यात एकाच वर्षांत शाळांच्या साडेअकराशेहून अधिक खोल्या बांधून मोठी कामगिरी बजावली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य पथदर्शी आहे.
माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे निधन
राज्याचे माजी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे सोमवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले
![माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे निधन](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2015/07/mohite_patil1.jpg?w=1024)
आणखी वाचा
First published on: 06-07-2015 at 02:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratapsinh mohite patil passes away