आत्महत्येपूर्वी ‘आनंदी’ होती; आदल्या रात्री मैत्रिणीसोबत पार्टी
आत्महत्या करण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी प्रत्युषाने आपल्या मैत्रिणीला घरी पार्टीसाठी बोलावले होते. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत चाललेल्या या छोटेखानी पार्टीमध्ये प्रत्युषा कुठेही तणावात असल्याचे वाटत नव्हते, असा जबाब या पार्टीत हजर राहिलेल्या तिच्या एका मैत्रिणीने पोलिसांना दिला आहे. यामुळे प्रत्युषाच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रियकर राहुल राज सिंह याचाही जबाब शनिवारी नोंदवला. आमच्यात वाद होते; परंतु त्यामुळे प्रत्युषा आत्महत्या करेल असे वाटले नव्हते असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
‘बालिकावधू’ मालिकेतून जनतेच्या पसंतीस उतरून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली प्रत्युषा बॅनर्जी शुक्रवारी सायंकाळी तिच्या गोरेगाव येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली होती. पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीत घटना घडली तेव्हा प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज सिंह काही कारणांमुळे घराबाहेर गेल्याचे उघड झाले आहे. नेहमी घराची चावी सोबत ठेवणारा राहुल बाहेर जाताना चावी विसरला होता. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास परतल्यानंतर त्याने दार ठोठावले. प्रत्युषा काहीच प्रतिसाद देत नसल्याचे पाहून राहुलने वॉचमनला सांगून चावीवाल्याला बोलावले. यादरम्यान, शेजारच्या खोलीतील नोकराने मी घराच्या बाल्कनीतून जाऊन पाहतो, असे सांगितले. नोकर जेव्हा घरात गेला तेव्हा त्याला हॉलमध्ये प्रत्युषाने पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले. शनिवारी सायंकाळी ओशिवरा स्मशानभूमीत प्रत्युषावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात प्रत्युषाचा मृत्यू गळफासामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले.
पालकांचा राहुलवर अप्रत्यक्ष आरोप
प्रत्युषाचे पालक शनिवारी दुपारी मुंबईत पोहोचले. मुलीच्या आत्महत्येमुळे जबर धक्क्यात असलेल्या पालकांनी प्रत्युषा आणि राहुलमध्ये भांडणे होत असल्याचे पोलिसांना जबाबात सांगितले. प्रत्युषा त्याविषयी आम्हाला वरचेवर सांगायचीही. पण वाद इतके विकोपाला गेल्याचे वाटले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्युषाने स्वतहून आत्महत्या केली नसून तिला प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
..पण आत्महत्या करेल वाटले नव्हते
पोलिसांनी राहुल याचा जबाब नोंदविला तेव्हा भावनाविवश झालेल्या राहुलने प्रत्युषा इतका टोकाचा निर्णय घेईल यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे सांगितले. कुठल्याही दाम्पत्यात असतात असे वाद आमच्यात होते. पण ते गंभीर नव्हते. आम्ही लवकरच लग्न करणार होतो, असे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
जवळचे रुग्णालय सोडून अंधेरीला का नेले?
प्रत्युषा-राहुल राहत असलेल्या घरापासून अवघ्या पाच मिनिटांवर महापालिकेचे सिद्धार्थ रुग्णालय आहे. तिथे प्रत्युषाला नेण्याचे सोडून राहुलने तिला थेट २५ किलोमीटर लांब अंधेरीच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात का नेले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या वेळी गोंधळलेल्या अवस्थेत आपल्याला जे सुचले ते केले, असे राहुलने सांगितल्याचे कळते. दरम्यान, पोलिसांनी राहुल-प्रत्युषाचे मोबाइल जप्त केले असून त्यांची तपासणी करत आहेत.