‘बालिकावधू’फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलीस योग्य आणि पारदर्शक तपास करत नाहीत असे नाही, हे नमूद करत तपास गुन्हेअन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याची प्रत्युषाची आई शोमा यांची विनंती उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. एवढेच नव्हे, तर राहुलला पाठीशी घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचे वाटत नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. मात्र न्यायालयाने याचिका निकाली काढण्यास नकार देत ४ मे रोजी तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासाची कागदपत्रे पडताळून पाहिल्यानंतर सद्य:स्थितीत प्रकरणाचा तपास अन्य यंत्रणेकडे वर्ग करण्याची गरज नाही. याचिकाकर्त्यांनी तपासाबाबत केलेले आरोप लक्षात घेता स्थानिक पोलीस अयोग्य वा अपारदर्शक तपास करत असल्याचे वाटत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
प्रत्युषाच्या आईने केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती ए. एम. बदर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पोलीस योग्य दिशेने तपास करत असून त्यासाठी त्यांना आणखी वेळ देण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले. तसेच आतापर्यंतच्या तपासावरून तिला हेतुत: आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलेले आहे की नाही या निष्कर्षांप्रत पोलीस पोहचले आहेत का? असा सवाल करताना प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज सिंह आणि तिने एकमेकांना पाठवलेल्या मोबाइल संदेशांवरून हा निष्कर्ष काढण्यास मदत होऊ शकते, असेही न्यायालयाने सुचवले. या वेळी प्रकरणाचा तपास दोन महिन्यांत पूर्ण केला जाईल, असा दावाही त्यांनी केला.
तत्पूर्वी, आपला कोणावरही संशय नाही असे शोमा यांनी पहिल्या जबाबाच्या वेळेस सांगितले होते. त्यानंतर दोन दिवसांनी मात्र त्यांनी राहुलविरोधात तक्रार नोंदवल्याचे सरकारी वकील संदीप शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले. शिवाय आत्महत्येच्या वेळेस प्रत्युषा गर्भवती होती आणि ती वैद्यकीय उपचार घेत होती. संबंधित डॉक्टरचा जबाब नोंदवण्यात येणार असून त्यातून ती त्यांच्याकडे नेमके कसले उपचार घेत होती याचा तपास करण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader