काम मिळत नसल्याने तणावात असल्याचे निष्पन्न; प्रियकर राहुल व मित्रांचीही चौकशी होणार
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आर्थिक चणचण व चांगले काम मिळत नसल्याच्या ताणात आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, तिचा मित्र राहुलराज सिंग हा देखील आर्थिक चणचणीत असल्याचे समजत असून तो वेळो-वेळी प्रत्युषाची काळजीही घेत असल्याचे पुढे येत आहे. याला अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळू शकलेला नसला तरी, याबाबत सिनेक्षेत्रात चर्चा होत आहे.
‘बालिका वधू’ मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हीने शुक्रवारी गोरेगाव येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर तिला प्रियकर राहुल याने कोकिलाबेन रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर बांगूरनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आणि पोलीस निरीक्षक दिपक फटांगरे तपास करत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून प्रत्युषाला काम मिळत नव्हते, त्यामुळे तिला पैशांची निकड होती. तसेच प्रियकर राहुल सिंगही काम मिळवण्याचा प्रयत्न करत होता. त्यातच येत्या दुर्गाष्टमीला त्यांनी लग्न करण्याचेही ठरवले होते. त्यामुळे एकंदरीत दोघांनाही भविष्याच्या चिंतेने ग्रासले होते. यात प्रत्युषा नैराश्यात असल्याचे राहुलला ठाऊक होते, त्यामुळे तोही शक्यतो तिची काळजी घेत होता. या ताणातूनच प्रत्युषाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला असून प्रत्युषाचे ज्या मित्रांसोबत पटत नव्हते अशांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्युषा व तिचा मित्र राहुल यांचे फेसबुक व ट्विटर खाते व बँक खाती देखील तपासण्यात येणार आहेत. यात काही चुकीचे आढळल्यास राहुलची चौकशी करण्यात येणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांने स्पष्ट केले. राहुलचा जबाब पोलिसांनी नोंदविला असून चौकशीनंतर त्याने छातीत दुखू लागल्याची तक्रार केल्याने त्याला मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Story img Loader