प्रत्युषाच्या आईचे पोलीस तपासावर पत्रातून प्रश्नचिन्ह; अधिकाऱ्यांना सूचना
प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येचा तपास गुन्हे शाखेकडे देण्याचे संकेत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले आहेत. मुंबई पोलिसांना प्रत्युषाच्या आत्महत्येचा तपास अग्रक्रमाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस तपास योग्यप्रकारे करत नसतील तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मी स्वत पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून गरज पडल्यास त्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्युषाच्या आईने मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पोलीस आयुक्त यांना तपासाविषयी असमाधान व्यक्त करत गुन्हे शाखेकडून तपास करण्याची विनंती केली होती.
बालिकावधूफेम प्रत्युषा बॅनर्जीे १ एप्रिल रोजी गोरेगावच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या गुन्ह्य़ाचा तपास बांगूरनगर पोलीस करत असून प्रत्युषाची आई सोमा बॅनर्जी यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज सिंह याच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, गुन्हा दाखल झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या राहुलने उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवला. प्रत्युषाच्या आत्महत्येला राहुलच जबाबदार असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी सोमा बॅनर्जी यांनी बुधवार, १३ एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना पत्र लिहून केली. राहुलने केवळ माझ्या मुलीलाच फसवले नाही तर त्याने अनेक मुलींना पैशांसाठी फसविले आहे. बांगूरनगर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सोमा यांनी पोलिसांनी राहुलला पुरावे नष्ट करण्याची संधी दिली, आताही तो आम्हाला आणि साक्षीदारांना धमकावत असून दुसरीकडे पोलिसांचा तपास थंडपणे सुरू आहे, त्यामुळे या गुन्ह्य़ाचा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा, अशी विनंती त्यांनी पत्रात केली होती. या पत्राविषयी गृहराज्यमंत्री पाटील यांना विचारले असता, सोमा बॅनर्जी यांचे पत्र आम्हाला मिळाले असून, पोलिसांना योग्यप्रकारे तपास करण्याच्या सूचना दिल्या असून गरज पडल्यास तपास गुन्हे शाखेकडेही वर्ग करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा