मुंबई : राज्याची विस्कटलेली आर्थिक स्थिती सावरतानाच सरकारमध्ये पुन्हा एकदा वित्तीय शिस्त आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन अशा मोफत योजनांमुळे राज्याची आर्थिक घडी कोलमडून पडली आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाकडून निधीसाठी डावपेच खेळले जात आहेत. परिणामी राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण आता सरकारसाठी चिंतेची बाब ठरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेल्या वित्त विभागावरही लक्ष ठेवण्यासाठी आणि पुन्हा एकदा आर्थिक शिस्त आणण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यानुसार फडणवीस यांनी आपल्या खास मर्जीतील प्रवीण परदेशी यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. परदेशी सध्या ‘मुंबई हेरिटेज कंझर्वेशन कमिटी’ आणि ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे अध्यक्ष म्हणूनही काम करीत आहेत.