महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) माजी आमदार प्रवीण दरेकर, वसंत गिते आणि रमेश पाटील या तीन शिलेदारांनी मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच मनसेचे पदाधिकारी अखिलेश चौबे देखील भाजपच्या कळपात सामिले झाले आहेत.
आगामी महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा लावला असून याचाच एक भाग म्हणून मनसेचे माजी आमदार प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि कल्याणचे रमेश पाटील यांच्यासह मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना भाजपात सामिल करुन घेण्यात आले.
वसंत गीतेंच्या भाजप प्रवेशामुळे मनसेच्या नाशिक गडाला मोठे खिंडार पडले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर मनसेतील अनेकांनी पक्षातून बाहेर पडण्यास सुरुवात केली.  प्रवीण दरेकर व वसंत गीते यांनी यापूर्वीच पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दोघांचा राजीनामा स्वीकारताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढे त्यांच्याशी संपर्क न ठेवण्याचे आदेश जारी केले होते. प्रवीण दरेकर व गीते यांनी पक्षस्थापनेपूर्वीपासून राज यांना साथ दिली होती. मनसेच्या स्थापनेनंतर नाशिकचे माजी महापौर असलेल्या गीते यांनी नाशिकमध्ये पक्षबांधणीच्या केलेल्या कामामुळे मनसे महापालिकेत सत्तेपर्यंत पोहोचला तर २००९च्या विधानसभेत मनसेचे तीन आमदार निवडून आले होते. तथापि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दरेकर, गीते आणि रमेश पाटील यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा