विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अमरावतीतील हिंसाचारावरून आक्रमक भूमिका घेतलीय. त्रिपुरात घटना घडते म्हणून महाराष्ट्रात दादागिरी करणार असाल, तर खपवून घेणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिलाय. तसेच यावर महाराष्ट्र सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केलीय. कारवाई न झाल्यास हे प्रकरण हाताबाहेर जाईल, असंही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रविण दरेकर म्हणाले, “त्रिपुरात घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात अशा प्रकारचा उद्रेक होता कामा नये. तुम्ही इथली शांतता भंग करणार असाल, तर महाराष्ट्र सरकारने त्यावर तातडीने कारवाई करावी. अशा प्रकारचा जातीय तणाव निर्माण होणार असेल तर ते महाराष्ट्रासाठी योग्य राहणार नाही. मग अशा प्रवृत्ती त्रिपुरात घटना घडते म्हणून इथं दादागिरी करणार असेल तर महाराष्ट्रात चालणार नाही. खपवून घेणार नाही. सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा हे प्रकरण हाताबाहेर जाईल.”

भाजपा कार्यकर्त्यांडून शहरात मोठ्या प्रमाणात तोडफोड

दरम्यान, त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) मुस्लीम समाजाने काढलेल्या मोर्चा दरम्यान हिंसाचार झाला. त्याचा निषेध म्हणून आज (१३ नोव्हेंबर) भाजपच्या वतीने अमरावती बंद पुकारण्यात आला. या बंदला हिंसक वळण लागले आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नमुना परिसर तसेच अंबापेठ परिसरात अनेक दुकाने फोडण्यात आली. एका हॉस्पिटलवर देखील दगडफेक करण्यात आली आहे.

“भाजपाचा मोर्चा शांततेने होईल अशी अपेक्षा होती. मात्र वेगळं वळण लागलं”

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, “त्रिपुरा घटनेबाबत काल निवेदन देण्याच्या दृष्टिकोनातून परवानगी मागितली होती. ते निवेदन देऊन परत जाताना काही लोकांमुळे याला वेगळं वळण लागलं. भाजपाचा मोर्चा शांततेने होईल अशी अपेक्षा होती. मात्र वेगळं वळण लागलेलं आहे. पोलीस विभाग आवश्यक पावलं टाकत आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी बोलत आहेत. राज्य महत्त्वाचे आहे. सर्वांनीच सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.”

हेही वाचा : “पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे”; राज्यात घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांचे निर्देश

“मुस्लीम समाज आक्रमक झाला असं वक्तव्य करणे योग्य नाही. कुणी चिथावणी देत असेल तर कारवाई केली जाईल. संपूर्ण राज्यात शांतता आहे. घटना फक्त अमरावतीमध्ये घडत आहे. तेथील परिस्थिती थोड्या वेळेत नियंत्रणात येईल,” असंही दिलीप वळसे यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin darekar warn maharashtra government over amravati violence pbs