उन्हाच्या झळांनी त्रासलेल्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण पट्टय़ात रविवारी सायंकाळनंतर कडकडाट आणि गडगडाटासह ओलेचिंब सुख बरसले! मान्सून केरळात दाखल झाला असून अद्याप मुंबई व परिसरात तो येणे बाकी असल्याने हा पाऊस मान्सूनचा की मान्सूनपूर्व अशा कोरडय़ा चर्चेशी काहीही देणेघेणे नसलेल्या मुंबईकरांनी वळवाच्या सरी अंगावर घेत जल्लोष साजरा केला.राज्यभरातील तापमानाचे आकडे ऐकूनच घामेजणाऱ्या मुंबई-ठाणेवासियांना गेले काही दिवस ‘गडय़ा आपले शहर बरे’ असे वाटत होते. तरी उन्हाची काहिली सहनही होत नव्हती. त्यामुळे रविवारी सायंकाळी आकाशात काळे ढग जमू लागले आणि मध्येच विजा चमकू लागल्या तेव्हा लोकांनी इमारतींच्या गच्चीवर, अंगणामध्ये तर मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगतसुद्धा गर्दी केली. विजांचा चमचमाट होत असला तरी पावसाचा पत्ता नव्हता. अखेर हलक्या सरी पडू लागताच पावसाच्या मैफलीसाठी आतुरलेल्या रसिकांनी एकच जल्लोष सुरू केला. धीम्या लयीत सुरू झालेल्या या मैफलीत सनन् सन् सरींचा तराना सुरू झाला तेव्हा त्या पहिल्या सरींमध्ये चिंब भिजण्याचा आनंद अनेकांनी अनुभवला.     
प्रथेप्रमाणे रेल्वेचाही गोंधळ
पाऊस पडला की कोलमडण्याची प्रथा मध्य रेल्वेनेही जपली. रविवारी रात्री कल्याण आणि कसारा दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होऊन दोन्ही दिशेची वाहतूक रात्री उशीरापर्यंत विस्कळीत झाली. त्यात भर म्हणून उल्हासनगरला रात्री सव्वा आठ वाजता मुंबईकडे येणाऱ्या गाडीत बिघाड झाला तर कल्याणला रात्री साडेआठला सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा