समीर कर्णुक
गैरसोयीचे असल्याची रिक्षा-टॅक्सीचालकांची तक्रार
सीएनजी गॅस पंपाबाहेर लागणाऱ्या वाहनांच्या रांगांमुळे अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महानगर गॅसने ऑनलाइन सीएनजी गॅस नोंदणी सुविधा सुरू केली असली तरी त्याला अनेक रिक्षा-टॅक्सीचालकांनी विरोध दर्शविला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी गॅस स्वस्त असल्याने रिक्षा-टॅक्सीसोबत अनेक खासगी वाहनेदेखील सध्या सीएनजीवर चालवली जात आहेत. परिणामी मुंबईतील गॅस पंपावर लांबच-लांब रांगा लागतात. मुंबई शहरात सध्या दीडशे सीएनजी पंप आहेत. गॅस भरण्यास वेळ लागत असल्याने या पंपांवर वाहनचालकांना रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीही होते. ही बाब लक्षात घेत महानगर गॅसने सीएनजी गॅस भरण्यासाठी अॅपवर नोंदणीचा पर्याय दिला आहे.
सध्या मुंबईत ताडदेव आरटीओ, वडाळा आणिक डेपोसमोर आणि देवनार येथे महानगर गॅसचे पंप आहेत. या तिन्ही ठिकाणी महानगर गॅसने ही सेवा सुरू केली आहे. मात्र अॅपवर नोंदणी करून गॅस भरण्याला रिक्षा-टॅक्सीचालकांनी विरोध दर्शवला आहे. या अॅपवर बुकिंग केल्यावरदेखील वेळेत गॅस मिळत नाही. या अॅपमुळे काहीच फरक पडलेला नाही, अशी तक्रार रिक्षाचालक शरद सावंत यांनी केली. अनेक चालकांना अॅप वापरता येत नाही. त्यांच्यासाठी हे गैरसोयीचे असल्याने ते तत्काळ बंद करून पूर्वीप्रमाणेच गॅस भरणा सुरू ठेवावा, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन युनियनचे अध्यक्ष एल. क्वाड्रोस यांनी केली. याविरोधात सोमवारी आणिक डेपोसमोरील गॅस पंपावर मुंबई टॅक्सीमेन युनियनने काही वेळ आंदोलनही केले.
नोंदणीची पद्धत
प्रथम ‘ई टोकन सीएनजी’ हा अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करावा लागतो. त्यात चारचाकी, तीनचाकी वाहनांपैकी पर्याय निवडल्यानंतर सीएनजी पंपचा कोड टाकून आपली वेळ आणि गाडी नंबर या अॅपमध्ये भरावा लागतो. त्यानुसार आपल्याला तत्काळ गॅस भरण्याच्या वेळेचा संदेश मिळतो. एसएमएसनेही नोंदणी करता येते. ८४२२८०२२८० या क्रमांकावर सीएनजी पंप क्रमांक आणि गाडीचा नंबर पाठवल्यास काही क्षणात सीएनजी भरण्याची वेळ संदेशाद्वारे दिली जाते.
शहरात इतरही गॅस पंप आहेत. मात्र काही पंपांवर नोंदणीद्वारेच गॅस भरला जात असल्याने आम्हाला आमचा परिसर सोडून चेंबूर अथवा गोवंडी परिसरात गॅस भरण्यासाठी जावे लागत आहे.
– मोहम्मद अन्सारी – टॅक्सीचालक
सध्या हे अॅप नवीन असल्याने वापरताना रिक्षा-टॅक्सीचालकांना थोडय़ा अडचणी येतील. मात्र भविष्यात त्यांना त्याचा फायदा होईल. त्यांना रांग लावण्याची गरज भासणार नाही.
– मीरा अस्थाना, महानगर गॅस