मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – दादर टप्प्यात चाचणीपूर्व चाचणीला (प्री ट्रायल रन) आठवड्याभरापासून सुरुवात झाली आहे. आरे – दादर दरम्यान मेट्रो गाड्या यशस्वीपणे धावत आहेत. आता लवकरच आरे – वरळी दरम्यान मेट्रो गाड्या धावणार आहेत. लवकरच एमएमआरसीकडून आरे – वरळी दरम्यान चाचणीपूर्व चाचणी सुरू केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएमआरसीने ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. ही संपूर्ण मार्गिका आतापर्यंत वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक आणि इतर कारणांमुळे या मार्गिकेस विलंब झाला. पण आता मात्र ऑगस्टपर्यंत आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. त्यानुसार आरे – बीकेसीदरम्यानच्या चाचण्या सुरू असून जूनच्या मध्यावर सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे. पहिला टप्पा सेवेत दाखल केल्यानंतर काही दिवसातच बीकेसी – वरळी आणि त्यानंतर वरळी – कुलाबा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. त्यामुळेच आता एकीकडे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या बांधकामास वेग देण्यात आला आहे. तर दुसरीकडे आरे – दादर दरम्यान चाचणीपूर्व चाचणी सुरू करण्यात आली आहे. लवकरच आरे – वरळी दरम्यान चाचणीपूर्व चाचणीस सुरुवात होईल, अशी माहिती एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा… Ghatkopar Hording Collapse : ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता!

हेही वाचा… मुंबई : माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना अटक

आठवड्याभरापासून आरे – दादर दरम्यान चाचणीपूर्व चाचणी सुरू आहे. त्यामुळे मागील आठवड्यात पहिल्यांदाच आरे – दादर दरम्यान भुयारी मेट्रो गाडी धावली. लवकरच वरळीपर्यंत गाडी धावेल. बीकेसी – वरळी दरम्यान दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्या सुरू होतील आणि काही महिन्यातच दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल. दरम्यान, भुयारी मेट्रोतून प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pre trial of metro 3 started between aarey to dadar mumbai metro rail corporation begins pre testing mumbai print news asj
Show comments