मध्याश्मयुग
प्राचीन मुंबई अर्थात साष्टी बेटावरील मानवी अस्तित्वाच्या शोधाला कांदिवलीपासून सुरुवात झाल्यानंतर गोरेगाव, बोरिवली, पाली हिल, मालाड, मनोरी, मार्वे, विहार तलावाचा परिसर अशा विविध ठिकाणी लेफ्टनंट कमांडर के. आर. यू टॉड यांना अश्महत्यारे सापडली. अनुक्रमे १९३२, १९३९, १९४८ आणि १९५० अशा चार शोध मोहिमा त्यांनी पार पाडल्या. तर ए. एस. कलापेसी (१९४६), एस. सी. मलिक (१९५९) आणि एच. डी. सांकलिया (१९५९-६०) या पुरातत्त्वज्ञांनीही मुंबईमध्ये अश्मयुगीन हत्यारांचा शोध घेतला. त्यानंतर गेल्या सुमारे ५० वर्षांहून अधिक कालखंडात काहीच झाले नाही. मात्र गत दोन वर्षांमध्ये मुंबई विद्यापीठाचा बहि:शाल शिक्षण विभाग, इंडिया स्टडी सेंटर (इन्स्टुसेन), आयसर- मोहाली आणि साठय़े महाविद्यालयाच्या वतीने साष्टी बेटाच्या गवेषणाच्या प्रकल्पांतर्गत पुन्हा एकदा नव्याने मनोरी बेटाचा शोध घेण्यात आला. यामध्ये मनोरी बेटावर किनाऱ्यानजीक मध्याश्मयुगातील अश्महत्यारे तयार करणारे ठिकाणच सापडले. आधुनिक भाषेत बोलायचे तर अश्मयुगीन हत्यारे तयार करणाऱ्या एखाद्या कंपनीप्रमाणे इथे हा उद्योग सुरू होता.
मोठय़ा संख्येने असलेल्या तयार उत्पादनाबरोबरच, त्यासाठी वापरलेला कच्चा माल, उत्पादन करताना निर्माण झालेले उपउत्पादन आणि या प्रक्रियेमध्ये तयार झालेला कचरा असे सारे काही एकाच ठिकाणी सापडते, त्या वेळेस या सर्व गोष्टी एखाद्या कंपनीचे किंवा उद्योगाचे अस्तित्व स्पष्ट करतात. त्याचप्रमाणे अश्महत्यारांसाठी कच्चा माल म्हणून वापरलेल्या मूळ दगडाचा गाभा (कोअर), त्या गाभ्याचा काढून टाकलेला भाग (फ्लेक्स) आणि निरुपयोगी दगडांचा कचरा असे सारे काही एकत्रित सापडते त्या वेळेस ते अश्मयुगातील उद्योगाचे ठिकाण असल्याचे स्पष्ट होते. मुंबई विद्यापीठाच्या या चमूला गेल्याच वर्षी म्हणजे २०१७ साली मनोरी बेटावर असे ठिकाण सापडले. म्हणून या शोधाला महत्त्व होते. याबाबत पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातील पुरातत्त्वज्ञ डॉ. अभिजित दांडेकर सांगतात, संगणक अस्तित्वात आले त्या वेळेस त्याचा आकार एखाद्या खोलीएवढा मोठा होता मात्र क्षमता कमी होती. नंतर त्याचा आकार लहान आणि क्षमता मात्र वाढत गेली. आता प्रस्तुत कालखंडात हाती असलेला मोबाइल हा एक प्रगत संगणकच ठरतो. मानवी प्रगतीच्या कालखंडात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ही प्रगतीची मोठी उडीच आहे. त्याचप्रमाणे मनोरी येथे सापडलेली विविध कालखंडांतील अश्महत्यारे ही काही लाख वर्षांपूर्वी मानवाने घेतलेली तंत्रज्ञानातील उडीच स्पष्ट करणारी आहेत. मोठय़ा आकारापासून लहानाकडे; मात्र क्षमतेच्या बाबतीत अनेक पटींनी वाढ असे हे समीकरण आहे.
१९३१ साली टॉड यांनी सर्वप्रथम मार्वे येथे उत्खनन केले, तिथे त्यांना लहान आकारातील अश्महत्यारे (मायक्रोलिथ्स) सापडली. त्याबाबत आपले मत नोंदविताना टॉड यांनी म्हटले होते की, इथे अगेट, चाल्सिडोनी आणि चर्ट या दगडांचा वापर हत्यारांसाठी करण्यात आल्याचे आढळते. इथेच मातीच्या खालच्या थरात सापडलेली हत्यारे ही कांदिवलीमध्ये सापडलेल्या अश्महत्यारांसारखी आहेत. त्यामुळे इथे वरच्या थरात सापडलेली हत्यारे ही कांदिवलीच्या नंतरच्या कालखंडातील आहेत हे स्पष्ट होते. मात्र मुंबईत सापडलेली ही हत्यारे विंध्य पर्वतरांगांमध्ये सापडलेल्या हत्यारांपेक्षा निश्चितच जुनी आहेत.
गेल्या वर्षी सापडलेल्या अश्महत्यारांचे वैशिष्टय़ म्हणजे मध्याश्मयुगामध्ये साष्टीच्या म्हणजेच प्राचीन मुंबईच्या किनारपट्टीवर दीर्घकाळ असलेले माणसाचे वास्तव्य त्यामुळे सिद्ध होते. मध्याश्मयुगातील माणूस ठरावीक काळाने किनारपट्टीला नियमित भेट देत होता एवढेच नव्हे तर सागराशी संबंधित बाबींचा वापर म्हणजे मासे, किनारपट्टीवर वाढणारी झाडे- झुडपे- फळे- कंदमुळे यांचा वापर गुजराण करण्यासाठी तो करत होता, हेही लक्षात येते.
टॉड यांना सापडलेल्या प्रागैतिहासिक मुंबईतील मनोरीच्या ठिकाणापासून गेल्या वर्षी सापडलेले ठिकाण हे सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर आहे. इथे टेकडीचा भाग आणि उतार पाहायला मिळतो. तिथेच मातीच्या वरच्या थरामध्ये लहान आकाराची अश्महत्यारे सापडली. त्यानंतर १० सेंमी. खालपर्यंत अश्महत्यारे सापडतच गेली. या हत्यारांचे ३३५ नमुने गोळा करण्यात आले. त्यात प्रामुख्याने विविध प्रकारची अश्महत्यारे, त्यांचा काढून टाकलेला भाग, अश्मपाती व मूळ दगडाचा गाभा यांचा समावेश होता. या परिसरात करण्यात आलेले प्रायोगिक उत्खनन मोहाली येथील ‘आयसर’चे तज्ज्ञ डॉ. तोसाबंता प्रधान यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या उत्खननाच्या निष्कर्षांबाबत ते सांगतात, सर्व प्रकारची अश्महत्यारे तयार करण्याचे काम एखाद्य उद्योगाप्रमाणचे इथे चालायचे त्याचे सर्व पुरावे सापडले आहेत. या हत्यारांमध्ये हातकुऱ्हाड, ज्या दगडापासून हत्यार करण्यात आले त्याचा मूळ गाभा, वस्तरा, तासणी किंवा रापी, तोडहत्यार, लंबगोलाकृती पाते, छिन्नी, टोच्या किंवा वेधणी, चंद्रकोरीच्या आकाराचे पाते आणि अतिसूक्ष्म अश्महत्यारे आदींचा समावेश होता. ही हत्यारे जमिनीच्या विविध थरांमध्ये सापडली. यामध्ये चाल्सिडोनीपासून हत्यारे तयार करताना ते तापविण्यात आले होते, असे लक्षात आले. एखादा दगड टणक व कठीण असतो त्या वेळेस त्यापासून हत्यारे तयार करणे सोपे जावे यासाठी तो तापवून मग नंतर त्यावर काम केले जायचे. पश्चिम भारतात अनेक ठिकाणी तत्कालीन माणसाने हे तंत्र वापरल्याचे लक्षात आले आहे. मनोरी हे त्याला अपवाद नाही. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे सापडलेली आणि शेलपासून तयार केलेली अश्महत्यारे. उत्तर अश्मयुगात युरोपात माणसाने शेलचा वापर अशा प्रकारे केलेला पाहायला मिळतो. असा वापर मुंबईत मात्र प्रथमच आढळला आहे. अधिक अभ्यासात त्यावर अधिक प्रकाश पडू शकेल. शेलच्या अश्महत्यारांचा शोध हा अशा प्रकारे प्रागैतिहासिक मुंबईच्या इतिहासावरचा नवा प्रकाशझोत ठरला आहे.
विनायक परब vinayak.parab@expressindia.com
@vinayakparab