लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : देशभरातील रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकास करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत २६ फेब्रुवारी रोजी या कामांचा पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी भारतीय रेल्वेमधील सर्व विभागीय जनसंपर्क कार्यालयांना निरनिराळ्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच पायाभरणी समारंभाची कोनशिला हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेसह संस्कृतमध्ये तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भारतीय रेल्वेमध्ये हिंदीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. आता संस्कृत भाषेच्या संवर्धनावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेच्या कार्यक्रमात संस्कृत भाषेलाही प्राधान्य देण्यात येत आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १,५०० उड्डाणपुलाचे लोकार्पण आणि अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ५५४ स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे. या स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

आणखी वाचा-मुंबई महानगरपालिका प्रशासन सेवानिवृत्त उपायुक्तावर मेहेरबान

भारताच्या प्राचीन संस्कृतीचे आणि भाषेचे जतन करण्यासाठी संस्कृत भाषेत कोनशिला तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी उरण – खारकोपर रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची कोनशिला संस्कृत भाषेत उपलब्ध करण्यात आली होती, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या अमृत भारत स्थानक संकल्पनेवर आधारित शालेय विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी चित्रकला आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भायखळा, चिंचपोकळी, दिवा, इगतपुरी, कुर्ला, माटुंगा, मुंब्रा, सँडहर्स्ट रोड, शहाड, टिटवाळा, वडाळा रोड, विद्याविहार, पनवेल आणि खंडाळा येथील ४४ शाळांमधील ६,९५० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागातील १०७ शाळांमधील ६२ हजार ५०० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.

आणखी वाचा-मुंबई : म्हाडा कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठी शनिवारी सोडत काढणार

अमृत भारत स्थानक योजनेमधील स्थानकांच्या कामाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी या पायाभरणी कामाची कोनशिला हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेसह संस्कृतमध्येही असणार आहे. -डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preference for sanskrit in railway programme cornerstone in hindi english and regional languages including sanskrit mumbai print news mrj