नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश पदाधिकारी मंगळवारी जाहीर केले असून त्यात ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे समर्थकांचा वरचष्मा असल्याचे किंवा अगदी ‘टीम मुंडे’ असल्याचे दिसून येत आहे.
आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची चांगली कामगिरी व्हावी यासाठी नेत्यांच्या छत्रछायेत राहणाऱ्या नेत्यांपेक्षा जनाधार असलेल्या चाळीशीच्या घरातील नेत्यांची निवड भाजपच्या सरचिटणीसपदी करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी असलेल्या रघुनाथ कुलकर्णी यांना नवीन पदाधिकाऱ्यांमधून वगळण्यात आले आहे.
फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या नवीन टीममध्ये कोणाचा समावेश असणार आणि आगामी निवडणुका लक्षात घेऊन कोणाची वर्णी लागणार, याविषयी उत्सुकता होती.
मुंडे यांना पक्षाने राज्यात सर्वाधिकार बहाल केल्याने त्यांचा वरचष्मा राहील, हे उघडच होते. याआधी सरचिटणीसपदी असलेल्या काही पदाधिकाऱ्यांना उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. आता चैनसुख संचेती (बुलडाणा), सुभाष देशमुख ( सोलापूर), आमदार चंद्रकांत पाटील (कोल्हापूर), खासदार रावसाहेब दानवे (जालना), आमदार गिरीष महाजन (जळगाव), आमदार प्रकाश शेंडगे (सांगली), आमदार मंगलप्रभात लोढा (मुंबई), रामदास तडस (वर्धा), प्रकाश मेहता (मुंबई), मनीषा चौधरी (मुंबई), जयप्रकाश ठाकूर (मुंबई), सुरेश खाडे (सांगली), नीता केळकर (सांगली), गोविंद केंद्रे (लातूर) यांची नियुक्ती उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे. तर माजी नगराध्यक्ष सुजितसिंह ठाकूर (उस्मानाबाद), आमदार जयकुमार रावल (धुळे), माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर (लातूर), आमदार डॉ.रणजित पाटील (अकोला),आमदार प्रा.राम शिंदे (नगर), आमदार संजय भेगडे (पुणे) यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. रवींद्र भुसारी हे संघटन सरचिटणीस म्हणून काम पाहतील, तर सहसंघटन चिटणीसपदी सुनील कर्जतकर व डॉ. राजेंद्र फडके यांची नियुक्ती झाली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी आहे.
चिटणीसपदी माधुरी मिसाळ (पुणे), सुनील बढे (जळगाव), अतुल सावे (औरंगाबाद), सीमा हिरे (नाशिक), आमदार चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर), योगेश गोगावले (पुणे), निवेदिता चौधरी (अमरावती), विजय गव्हाणे (परभणी), डॉ.भागवत कराड (औरंगाबाद), मेधा कुलकर्णी (पुणे), हरीश मोरे (भंडारा), हरिश्चंद्र भोये (ठाणे), वर्षां भोसले (नवी मुंबई), आर.टी.देशमुख (बीड), जमाल सिद्दीकी (नागपूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोषाध्यक्षपदी शायना एन सी असतील. प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी प्रताप आशर तर अध्यक्षांचे राजकीय सल्लागार म्हणून आमदार सुधाकर देशमुख काम पाहतील.
महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी स्मिता वाघ यांची नियुक्ती झाली असून मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांची युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. नानाजी शामकुळे अनुसूचित जाती मोर्चाचे तर अशोक नेते हे अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष असतील.
जनाधार असलेल्या तरुणांना प्राधान्य
नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश पदाधिकारी मंगळवारी जाहीर केले असून त्यात ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे समर्थकांचा वरचष्मा असल्याचे किंवा अगदी ‘टीम मुंडे’ असल्याचे दिसून येत आहे.
First published on: 22-05-2013 at 04:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preference to public supported youth