शैलजा तिवले
२० ते ३० टक्के महिलांमध्ये आजाराचे निदान; बदलत्या जीवनशैलीचा परिणाम
गेल्या दशकभरात गर्भवती महिलांच्या मधुमेहाचीही तपासणी होऊ लागल्याने वीस ते तीस टक्के गर्भवतींना मधुमेह असल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत असून त्यामुळे अर्भकाच्या आरोग्याचीही अधिक काळजी घ्यावी लागत आहे.
भारत हा मधुमेहाची राजधानी होत असल्याचे आकडेवारीतून समोर आल्यानंतर गरोदरपणामध्ये मधुमेहाच्या तपासणीवर विशेष भर देण्यास सुरूवात झाली. त्यामुळे आता सरकारी रुग्णालयांमध्ये गरोदर मातेची मधुमेह तपासणी आर्वजून केली जाते. त्यात यंदाची ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
‘दि डायबेटिस स्टडी ग्रुप ऑफ इंडिया’च्या (डीप्सी) मार्गदर्शक तत्त्वानुसार मातेला ७५ ग्रॅम ग्लुकोज देऊन त्याआधी आणि त्यानंतर दोन तासांनी मधुमेहाची चाचणी (ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट) करतात. चाचणी होणाऱ्यांची संख्या वाढल्याने मधुमेही मातांचे प्रमाण जवळपास तीनपट वाढलेले दिसून येते. त्यामुळे ही धोक्याची सूचना असून याकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे,’ असे वाडिया रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तृप्ती नाडकर्णी यांनी सांगितले.
२० ते ३० टक्के महिलांना मधुमेह झााला असला, तरी त्यातील ९९ टक्के महिलांना गरोदर काळातला मधुमेह झाला आहे. हा मधुमेह गर्भधारणेनंतर साधारणपणे पाचव्या महिन्यात दिसून येतो. प्रसूतीनंतर तो आपोआप बरा होतो. कारण प्रसूतीनंतर महिलेची रक्तातील साखर नियंत्रणात राहते. अर्थात अशा मातांना भविष्यात मधुमेह होण्याचा संभव असतो. त्यामुळे या मातांनी प्रसूतीनंतर जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे इन्डोक्रायनोलॉजीस्ट आणि मधुमेहतज्ज्ञ डॉ. शंशाक जोशी यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, मधुमेही मातांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. साधारणपणे चौथ्या महिन्यानंतर मातांची अयोग्य आहारपद्धती आणि वेळा यांचा शरीरावर होणाऱ्या परिणामांमुळे हा आजार उद्भवतो. पूर्वी गर्भवती मातांना घरातला सकस आहार दिला जात असे. त्या कष्टाची कामे करीत. आता संतुलित आहारासोबतच व्यायामही दैनंदिन जीवनातून हरवला आहे. पोटाचा लठ्ठपणा आणि अनुवांशिकता असल्यास गरोदरपणात मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. पोटाचा घेर हा ८० सें.मी. पेक्षा अधिक असल्यास तो गरोदरपूर्व काळात कमी व्हायला हवा.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राहुल मयेकर सांगतात, साखर गरोदरकाळात नियंत्रणात न राहिल्यास बाळाचे वजन वाढते. त्यामुळे अनेकदा सिझेरियनचा मार्ग अनुसरावा लागतो. मातेलाही रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. पोटात बाळाला आईकडून अधिक प्रमाणात साखर प्राप्त होत असल्यास बाहेर आल्यानंतर ती झपाटय़ाने कमी होते आणि साखरेवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. तसेच मधुमेही मातांच्या बालकांच्या हृदयावर किंवा इतर अवयवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. काही वेळेस बालकांनाही मधुमेह होण्याचा संभव असतो. त्यामुळे मधुमेही मातांचे वेळीच निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे.
वाडिया रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूजा बांदेकर म्हणाल्या की, चाचणीला प्राधान्य दिल्याने इतक्या मोठय़ा प्रमाणात मधुमेही माता दिसून येत आहेत. बदलती जीवनशैली यामागचे मुख्य कारण आहे. मानसिक ताणतणाव, गरोदर मातेची वाढलेली वयोमर्यादा, जेवणाच्या अनियमित वेळा, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे मातांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे.
घर आणि नोकरी ही दुहेरी जबाबदारी सांभाळताना महिलांकडून बऱ्याचदा आहाराकडे दुर्लक्ष केले जाते. जंकफूड, पनीर, चीज यासारख्या चरबीयुक्त पदार्थाच्या आहारातील वाढत्या समावेशाचाही परिणाम आरोग्यावर होत आहे. उपचाराच्या पहिल्या टप्प्यात आहारावर नियंत्रण आणल्यानंतर यातील ५० टक्के मातांची साखर नियंत्रणात येते यावरून हे स्पष्ट होते.
गर्भधारणेआधी घ्यायची काळजी..
* मधुमेहाची तपासणी
* संतुलित व नियंत्रित आहार व आहाराच्या वेळा पाळणे आवश्यक
* चरबी आणि कबरेदकांचे प्रमाण कमी
* पोटाचा लठ्ठपणा वाढला असल्यास तो कमी करणे.
* नियमित व्यायाम, तणावमुक्त वातावरण
मधुमेही मातांची नेमकी आकडेवारी सध्या उपलब्ध नाही. मात्र आता मधुमेही मातांचे निदान, तपासणी, देखरेख यावर अधिक भर देण्यासाठी सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये व्यापक कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी तपासणीपासून सर्व उपकरणेदेखील पुरविण्यात येतील. यासंबंधीचे प्रशिक्षण केंद्र सरकारकडून करण्यात येणार आहे. पुढील वर्षभरात राज्यभर हा कार्यक्रम सुरू होईल.
– अर्चना पाटील, अतिरिक्त संचालक, राज्य कुटुंब कल्याण विभाग