मुंबई : दुसऱ्या लाटेमध्ये गर्भवती महिलांना अधिक धोका असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी गर्भवतींना करोनाची लस देणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
गर्भवतींना करोना प्रतिबंधात्मक लस देण्याची परवानगी केंद्रीय आरोग्य विभागाने नुकतीच दिली असून याची मार्गदर्शक तत्त्वे ही जाहीर केली आहेत. गर्भवतींसाठी लस खरच सुरक्षित आहे का,अशी शंका असल्याने गर्भवती फारशा लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. लशीच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न महिलांकडून विचारले जात आहेत. त्याचे निरसन आम्ही करतो आणि लस घेण्याबाबतची माहिती देत आहोत, असे शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ. अरुण नायक यांनी सांगितले.
करोनामध्ये उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक महत्त्वाचा असून गर्भवतींसाठी सुरू केलेले लसीकरण योग्य निर्णय आहे. यामुळे या महिलांमध्ये संभाव्य धोके टाळणे नक्कीच शक्य होईल, असे ज्येष्ठ स्त्रीरोगज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी सांगितले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या लशींचा गर्भवती महिलांमध्ये काय परिणाम असतील याचा ठोस अभ्यास अद्याप झालेला नाही. त्यामुळे याबाबत कोणतेही भाष्य आता करता येणार नाही. परंतु करोना झाल्यामुळे होणारे धोके अधिक आहेत. त्यामुळे लस घेणे गरजेचे आहे, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी सांगितले. लशीचे अद्याप तरी कोणतेही दुष्परिणाम महिलांवर आढळलेले नाहीत. गेल्या तीन दिवसांत आमच्याकडे १०० हून अधिक गर्भवतींचे लसीकरण आम्ही केले आहे, असे डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितले.
संभ्रम अधिक
पहिल्या तीन महिन्यात बाळाची वाढ होत असल्यामुळे या काळात लस घ्यावी का याबाबतही महिलांमध्ये अनेक प्रश्न आहेत. करोनाबाधित गर्भवतींमध्ये बहुतांश धोके हे प्रसूतीच्या शेवटच्या टप्प्यात अधिक आढळले आहेत. त्यामुळे चौथ्या महिन्यापासून ही लस घेणे योग्य असल्याचे मत डॉ. अरुण नायक यांनी व्यक्त केले.
पूर्ण सुरक्षितता नाही
लस घेतली तरी १०० टक्के सुरक्षितता मिळेल असे नाही. त्यामुळे या महिलांनी लस घेतल्यानंतरही प्रतिबंधात्मक काळजी घेणे गरजेचे आहे, असे डॉ. रेखा डावर यांनी सांगितले.