मराठी चित्रपटांसाठी मागील वर्ष फारसे आल्हाददायक ठरले नसताना यंदा पहिल्या दोन महिन्यांतच दोन मराठी चित्रपटांनी उत्तम कामगिरी केली आहे. ‘बालक-पालक’ पाचव्या आठवडय़ातही प्रचंड प्रतिसादात सुरू असताना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ने पहिल्या तीन दिवसांतच ५० लाखांपेक्षा जास्त गल्ला जमा केल्याचे सूत्रांकडून समजते. हा चित्रपट केवळ ७० चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित करण्यात आला आहे, हे विशेष!
सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यात यश मिळवले आहे. या चित्रपटाला अत्यंत दमदार प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘प्रेमाची गोष्ट’च्या बरोबरच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील तब्बल १६ चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामुळे या चित्रपटाला कमी चित्रपटगृहे मिळाली आहेत. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आम्हालाही कळले आहे.
मात्र अधिकृत आकडेवारी आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. मात्र पुण्यात रविवारी ‘ई-स्वेअर’ आणि ‘सीटी प्राइड’ या दोन चित्रपटगृहांत कोणतीही जाहिरात न करता खेळ लावल्यानंतर हे दोन्ही खेळ ‘हाउसफुल्ल’ झाल्याचे सतीश राजवाडे यांनी सांगितले. सोमवारीही अनेक चित्रपटगृहांतील या चित्रपटाचे खेळ गर्दीत सुरू होते.

Story img Loader