जाणून घ्या आता या प्रवासासाठी किती रुपये मोजावे लागणार
मुंबई: मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबई विमानतळावरील काळ्या-पिवळ्या प्रिपेड टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळवरून प्रिपेड टॅक्सीने किमान सहा किलोमीटर अंतरावरील ठिकाणी जाण्यासाठी आता १४० रुपये, तर देशांतर्गत विमानतळाबाहेरून या टॅक्सी चार किलोमीटर अंतरासाठी ९३ रुपये मोजावे लागणार आहेत.
यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरून प्रिपेड टॅक्सीतून सहा किलोमीटर प्रवास करण्यासाठी १२७ रुपये, तर देशांतर्गत विमानतळवरून चार किलोमीटर प्रवासासाठी ८५ रुपये मोजावे लागत होते. आता या टॅक्सीने देशांतर्गत विमानतळावरून आठ किलोमीटर प्रवासासाठी १७९ रुपये, तर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १६ किलोमीटर प्रवासासाठी ३५८ रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात ९२ रिक्षा-टॅक्सी थांब्यांनाही मान्यता देण्यात आल्याची माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये ७३ रिक्षा थांबे, सात शेअर रिक्षा थांबे, नऊ टॅक्सी थांबे आणि तीन शेअर टॅक्सी थांबे यांचा समावेश आहे.
हेही वाचा >>> संजय राऊतांच्या भेटीनंतर अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “या भेटीत…”
रुफ लाईट इंडिकेटर बसविण्यास मुदतवाढ
योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी १ जुलै २०२१ पासून येणाऱ्या टॅक्सींवर रुफलाईट इंडिकेटर बसविणे सक्तीचे करण्यात आले होते. मात्र इंडिकेटर बसविण्याच्या निर्णयाला एमएमआरटीएने ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाद दिली आहे. प्रवाशांना काळ्या-पिवळ्या टॅक्सीची उपलब्धता समजावी यासाठी रुफलाईट इंडिकेटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. टॅक्सीच्या वरच्या बाजूला तीन रंगात प्रकाशित करणारे एकच इंडिकेटर बसविण्यात येणार आहेत. हिरवा रंग टॅक्सी उपलब्ध, पांढरा रंग टॅक्सी बंद आणि लाल रंग टॅक्सी उपलब्ध नाही असे दर्शविणार आहे.