लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : येत्या मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला अकरा दिवसांच्या गणेशमुर्तींचे विसर्जन होणार असून त्याकरीता मुंबई महापालिका प्रशसानाची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी मुंबई महानगरपालिकेचे सुमारे १२ हजार अधिकारी – कर्मचारी कार्यरत असतील. तसेच ७१ नियंत्रण कक्ष, ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांसह २०४ कृत्रिम तलाव तसेच अन्य विविध सोयीसुविधांची तयारी करण्यात आली आहे.
गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचा-यांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १९२ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ६६ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ७२ स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत.
गिरगांव चौपाटी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागामार्फत भाविकांसाठी विविध नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी या ठिकाणी भेट देवून रविवारी संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली.
अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. त्यामुळे गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी येणारी वाहने चौपाटीवरील वाळूत अडकू नयेत यासाठी चौपाटीच्या किना-यांवर ४७८ स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४३ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत, अशी माहिती उप आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली. विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी १६३ निर्माल्य कलशांसह २७४ निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाकडून ७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६७ रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’ च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी सुमारे १,०९७ फ्लडलाईट आणि २७ सर्चलाईट लावले आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी १२७ फिरती प्रसाधनगृहं सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.
२०४ कृत्रिम तलाव
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी महानगरपालिकेने यंदा तब्बल २०४ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. ‘क्यू आर कोड’द्वारे देखील भाविकांना, गणेश भक्तांना या कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा ‘क्यू आर कोड’ स्कॅन केल्यावर मुंबईतील कृत्रिम तलावांची माहिती आणि गुगल मॅप लिंक भाविकांना उपलब्ध होणार आहे. तसेच https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlGanpatiDeQR या लिंकवरूनही कृत्रिम तलावांची माहिती मिळू शकते.
आणखी वाचा-एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
विसर्जनादरम्यान घ्यावयाची काळजी-
१. समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.
२. मूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.
३. अंधार असणा-या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाणे टाळावे.
४. महानगरपालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.
५. समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवरक्षकांना कळवावे.
६. अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
७. भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरती आणि ओहोटी…..
यंदा अनंत चतुर्दशी दिवशी (दिनांक १७ सप्टेंबर २०२४) समुद्रात सकाळी ११.१४ वाजता ४.५४ मीटरची भरती, सायंकाळी ५.२२ वाजता ०.८६ मीटरची ओहोटी, रात्री ११.३४ वाजता ४.३९ मीटर उंचीची भरती असेल.
आणखी वाचा-मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान
दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे ५.२७ मिनिटांनी ०.४८ मीटरची ओहोटी, सकाळी ११.३७ वाजता ४.७१ मीटरची भरती असेल. या भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
मत्स्यदंशावर प्रथमोपचाराची सुविधा
ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या जलचरांचा वावर अधिक दिसून येतो. मत्स्यदंश झाल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच ‘१०८ रूग्णवाहिका’ही तैनात करण्यात आली आहे.