ऐन उन्हाळ्यात मसाला, पापड, लोणची तयार करण्याचे काम ठप्प
नीलेश अडसूळ, लोकसत्ता
मुंबई : टाळेबंदीचा काळ जसजसा वाढू लागला आहे तसतशी गृहिणींना मसाल्याची आणि वाळवणाची चिंता भासू लागली आहे. उन्हाळ्यात मसाले, पापड-लोणच्यांचा व्यवसाय मोठा प्रमाणावर चालत असतो. अनेक महिला या गृहउद्योग, बचत गटांवर अवलंबून असतात. परंतु टाळेबंदीमुळे हा व्यवसायही ठप्प झाल्याने परिणामी महिलांचा रोजगार बुडाला आहे.
मार्च-एप्रिल-मे हे उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत पापड, लोणची तयार करण्याचे काम मोठय़ा प्रमाणावर चालते. हे पदार्थ विकून काही महिला आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवितात. काही ठिकाणी असे उद्योग बचतगटांकडून चालवले जातात. टाळेबंदीत ‘सध्या बाजारपेठ बंद असल्याने कच्चा माल आणू शकत नाही. मसाले किंवा वाळवणाच्या पदार्थाकरिता कडक ऊन लागते, परंतु कच्चा मालच नसल्याने मसाले बनवायचे कसे,’ असा प्रश्न ‘हिरा मसाले’ या गृहउद्योगाच्या संगीता जाधव विचारतात. शिवाय गृहउद्योग असला तरी चार महिला मदतीसाठी लागतात. त्याही सध्या येऊ शकत नाही. मसाला कुटण्याचे डंख बंद आहेत. अशा अनेक अडचणी निर्माण झाल्याच्या महिला सांगतात.
मसाल्यांना नोकरदार महिलांकडून मोठी मागणी असते, परंतु उत्पादनच बंद असल्याने मागणी पूर्ण करणे शक्य नाही. ‘मंगलमूर्ती मसाले’ या गृहउद्योगाचे प्रतीक कारंजकर म्हणतात, ‘मसाले, पापड, सांडगे असे पदार्थ बनवणाऱ्या अनेक महिला आणि बचत गट मुंबईत आहेत. गेल्या दोन महिन्यांत त्यांचे रोजगारही गेले आणि उद्योगालाही फटका बसला. १७ मे नंतर काही अटीनियमांसहित बाजार खुला होणे आवश्यक आहे. अन्यथा या महिलांना उपजीविकेसाठी दुसरा व्यवसाय शोधावा लागेल. शिवाय पाऊस सुरू झाला तर परिस्थिती अधिकच कठीण होऊन बसेल,’ असे म्हणाले.
मुंबईतली एकूण परिस्थती पाहता लालबागला मसाला बाजार हा अनेकांसाठी पर्याय ठरू शकतो. गेली सहा दशकांहून अधिक काळ इथे वर्षभर मसाला बनवण्याचे काम सुरू असते. इथले मसाला उद्योजक ‘चव्हाण ब्रदर्स’चे विक्रम चव्हाण सांगतात, ‘आमच्याकडे १५ ते २० कामगार आहेत. यामध्ये महिला वर्गाचाही समावेश आहे. वर्षभर चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे झालेले नुकसान पुढे भरून काढता येईल. सध्या नुकसानीपेक्षा आमच्याकडे येणाऱ्या कामगारांची आणि ग्राहकांची सुरक्षा महत्त्वाची आहे.’
ग्राहकांची लूट
स्थानिक बाजारात व्यापारी चढय़ा भावाने मसाल्याचे पदार्थ आणि मिरच्या विकत असल्याने लालबागमध्ये गर्दी होऊ लागली आहे. प्रत्येक दुकानाबाहेर २० ते ३० लोकांचा गराडा आहे. याचा गैरफायदा लालबागमधील काही व्यापारीही घेत असल्याची माहिती ग्राहकांनी दिली. त्यांच्या मते, पूर्वी २२० ते २५० रुपये किलोला मिळणारी लवंगी मिरची आता ३५० ते ३७० या भावात विकली जात आहे. ३५० रुपयांना मिळणारी बेडगी मिरची ४८० पर्यंत, तर ४०० रुपयांना मिळणारी काश्मिरी मिरची ५४० रुपयापर्यंत विकली जात आहे.