कुलदीप घायवट
कुटुंबवत्सल टिटवी
एका ग्रामावरी जाऊन
एक नदीतीर पाहून
तेथे टिटवी करी शयन
दोन्ही पायांत खडा धरून गा
टिटवी यमाची तराळीण टिटाव टिटाव टिटाव
तीड तीड तीड जाणगा
या संत एकनाथ यांच्या भारुडामधून टिटवीला ‘यमाची तराळीण’ म्हटले आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या ओव्यांमध्ये, अनेक अभंग, दंतकथा, लोकसाहित्यातून टिटवीचे वर्णन केले आहे. संतवाणी मधून टिटवीच्या गुणवैशिष्टय़ाचे संदर्भ दिले आहेत. अभंग, ओव्या, भारुडातून टिटवीचे वर्णन केले आहे. त्यातून मानवाने बोध घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
टिटवी हा सामान्यपणे मुंबईमध्ये पाणवठय़ाच्या जागी, खाडीकिनारी, गवताळ भागात, कांदळवनाच्या ठिकाणी आढळून येतो. यासह संपूर्ण देशभरात आढळत असून श्रीलंका, पाकिस्तान, बलुचिस्तान, इराक, इराण, अफगाणिस्तान येथे आढळतो.
टिटवी हा जमिनीवर वावरणारा एक उड्डाणक्षम पक्षी. टिटवीचा समावेश ‘कॅरॅड्रीफॉर्मिस’ गणाच्या ‘कॅरॅड्रीइडी’ कुलात होतो. टिटवीचे शास्त्रीय नाव ‘व्हॅनेलस इंडिकस’ आहे. या जातीतील टिटवीच्या चोचेला लाल रंग असतो, म्हणून तिला ‘रक्तमुखी टिटवी’ म्हणतात. तसेच ‘पीतमुखी टिटवी’, ‘राम टेहकरी’, ‘हटाटी’ अशा नावाने देखील टिटवीला संबोधले जाते.
हेही वाचा >>>मुंबई-जीवी : पाणबुडया पाणकावळा
नर आणि मादी यांच्यात दिसण्यात जास्त फारसा फरक नसतो. फक्त मादीच्या तुलनेत नराच्या गुडघ्याचे हाड अधिक लांब असते. टिटवीची लांबी सुमारे ३५ सेंमी असते. टिटवीचे डोके, गळा काळय़ा रंगाचा असून छातीचा रंग काळा असतो. पाठ आणि पंख फिकट तपकिरी असतात. पोटाकडची बाजू पांढरी असते. पंखाची आणि शेपटीची टोके काळी असतात. चोच तांबडी आणि चोचीच्या टोकाकडे काळी असते. पाय लांबट आणि पिवळे असतात. एका पायाला तीन बोटे असून तिन्ही बोटे पुढच्या बाजूला असतात. डोळय़ांच्या मागून एक पांढरा पट्टा निघून गळय़ाच्या बाजूने खाली जातो.
अनेक नैसर्गिक व कृत्रिम वस्तू गोळा करून अतिशय कुशलतेने पक्षी घरटी बांधतात. मात्र टिटवीचे घरटे अत्यंत साधे असते. टिटवीला तीनच बोटे पुढच्या दिशेने असल्याने टिटवीला फांदीवर बसता येत नाही. त्यामुळे त्याचे घरटे झाडावर नसते. जमिनीवरील जागा खरडून त्याठिकाणी टिटवी अंडी घालते. टिटवीचा विणीचा हंगाम मार्च ते ऑगस्ट यादरम्यान असतो. जमिनीवर काही दगड गोलाकार रचून त्यात अंडी घातली जातात. फिकट तपकिरी रंगाच्या अंडय़ांवर लहानमोठे काळे डाग आणि ठिपके असतात. टिटवी ही कुटुंबवत्सल असून जोडीने किंवा तीन ते चार जणांच्या गटाने फिरते. टिटवी लहान कीटक, गोगलगायी, सुरवंट, अळय़ा खातात. तसेच धान्य, फुलांच्या पाकळय़ा खातात.
हेही वाचा >>> मुंबई-जीवी : तेजस्वी सूर्यपक्षी
रात्रीच्या वेळी ‘टिटवी टीटीव..टीटीव.टीङ्घटी’ असा गोंधळयुक्त असलेला आवाज कानावर पडला की, अशुभ घटना घडेल, रुग्णशय्येवर असलेल्या रुग्णांचे निधन होईल अशी मानवाने रुढ केलेली अंधश्रद्धा आहे. मात्र, हा आवाज टिटवीचा. टिटवी आपल्या पिल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी शत्रूच्या विरोधात आवाज करते. मात्र टिटवीच्या आवाजाला अंधश्रद्धेशी जोडले गेले आहे. काही वेळा शत्रूला पिल्ल्यांपासून रोखण्याठी स्वत: त्यांना चकवा देण्याची कला टिटवीत आहे. यावेळी पिल्लाकडे जाणाऱ्या साप, मुंगूस यांचे दुर्लक्ष करण्यासाठी टिटवी पंख किंवा पाय मोडल्याचे नाटक करतो. प्रसंगी हल्ला करून शत्रूला घरटय़ापासून दूर हुसकून देतात. मात्र, अंधश्रद्धेमुळे टिटवी बाबत तिरस्कार पसरला जातो.