मुंबई : मुंबई तसेच ठाणे, नवी मुंबईतील काही भागात शुक्रवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. हवामान खात्याने २३ जूनपासून कोकणातील काही भाग, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविला होता. तसेच २४ ते २५ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाले असून पुढील दोन दिवसांत मोसमी वारे दाखल होतील. दरम्यान, मुंबईत २४ जून रोजी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, मुंबईमधील पवई, बोरिवली, मुलुंड या परिसरात शुक्रवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती. मात्र मुंबईच्या उर्वरित भागात कडक उन्हामुळे मुंबईकर बेजार झाले होते.
हेही वाचा >>>अर्जविक्री-स्वीकृतीला १० जुलैपर्यंत मुदतवाढ, ‘म्हाडा’ मुंबई मंडळ सोडत २०२३
दरम्यान, बंगालच्या उपसागरावरून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरूवारी वाटचाल करत आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागासह तेलंगणा आणि ओडिशाच्या काही भागात प्रगती केली आहे. पूर्व भारतातील पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागातही मोसमी वारे दाखल झाला आहेत. मात्र तळकोकणात दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांची स्थिती महाराष्ट्राच्या अन्य भागात जैसे थेच आहे. तसेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांची सीमा रत्नागिरी, रायचूर, खाम्मम, मलकंगिरी, परलखेमुंडीपर्यंत, तर पूर्व भारतात हलदिया, बोकारो, पाटणा, राक्सौलपर्यंत आहे.