मुंबई : उत्कंठावर्धक कथानक, लक्षवेधी तांत्रिक बाजू आणि प्रयोगशील सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिलेली साथ, अशा उत्साहवर्धक वातावरणात उरण येथील जेएनपीए टाऊनशिपच्या बहुद्देशीय सभागृहात सर्वोत्कृष्ट ‘लोकसत्ता लोकांकिकां’चा ‘नाट्योत्सव’ प्रेक्षकांनी शनिवारी अनुभवला. यावेळी युवा रंगकर्मींच्या रंगमंचीय अविष्काराला दाद देण्यासाठी आणि प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी हजेरी लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील युवा रंगकर्मींच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या आणि त्यांच्यातील कलात्मकतेला प्रोत्साहन देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचे व्यासपीठ युवा रंगकर्मींसह प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. या स्पर्धेबाबत युवा रंगकर्मींमध्ये सुरुवातीपासूनच उत्साह पाहायला मिळाला असून उत्तरोत्तर ही स्पर्धा चुरशीची होत गेली. राज्यातील आठही केंद्रांवरील विभागीय अंतिम फेरी आणि महाअंतिम फेरीदरम्यान प्रेक्षकांच्या गर्दीने नाट्यगृह खचाखच भरून गेले होते. त्यामुळे दर्जेदार एकांकिकांची नाट्यपर्वणी पुन्हा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांनी सोडली नाही.

हेही वाचा >>>Mumbai Crime : मांजर लपवली म्हणून पाच वर्षांच्या मुलीला मारहाण, लोखंडी रॉडचे चटके; मुंबईतल्या ३८ वर्षीय महिलेला अटक

’नाट्योत्सवाच्या निमित्ताने नववर्षाची सुरुवात चैतन्यमय झाली. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणातील सर्व कर्मचारी व अधिकारी हे मराठी भाषेच्या बाबतीत हळवे आणि रसिक आहेत. आम्ही केंद्रीय मंत्रालयाबरोबर इंग्रजी व हिंदी भाषेत व्यवहार करतो, मात्र आमचे मराठी भाषेवरील प्रेम हे निरंतर आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अलीकडेच प्राप्त झाला. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेसाठी काही शाश्वत करावे, अशी आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची तसेच अधिकाऱ्याची इच्छा होती. त्याचवेळी युवा रंगकर्मींना चालना देणाऱ्या आणि मराठी कलाविष्काराला प्रोत्साहन देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या महत्त्वपूर्ण व्यासपीठाशी आम्ही जोडलो गेलो. या स्पर्धेला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’, असे जवाहरलाल पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सांगितले.

हेही वाचा >>>वर्सोवा दहिसर सागरी किनारा प्रकल्पाचे काम दीड दोन महिन्यात सुरू होणार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची घोषणा

‘मराठी माणसाच्या अंगातच नाटक ही कला भिनलेली आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण विषयांवर आधारित मराठी एकांकिकांचे सादरीकरण युवा रंगकर्मी करीत आहेत. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधींची कवाडे खुली झाली आणि या स्पर्धेतून पुढे आलेले युवा रंगकर्मी हे व्यावसायिक नाटक, मालिका आणि चित्रपटात झळकले. या स्पर्धेला यंदा जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने सहकार्य करून युवा रंगकर्मींना प्रोत्साहन दिले आहे’, असे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक मांडताना सांगितले.

यंदा कोल्हापूर विभागातील इस्लामपूर येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘व्हाय नॉट?’ या एकांकिकेने विजयी मोहोर उमटवत ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ होण्याचा बहुमान पटकावला. रत्नागिरी विभागातील देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या ‘मशाल’ या एकांकिकेने द्वितीय आणि पुण्यातील आयएमसीसी महाविद्यालयाच्या ‘सखा’ या एकांकिकेने तृतीय पारितोषिक पटकावले. या सर्वोत्कृष्ट तीन एकांकिका आणि अ. भा. पोर्ट प्राधिकरण स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती ‘चंदा’ या दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण प्रेक्षकांनी अनुभवले. दर्जेदार एकांकिका सादरीकरणाला प्रेक्षकांनी दाद दिली. तर निवेदक कुणाल रेगे यांच्या सूत्रसंचालनाने स्पर्धकांसह रसिकप्रेक्षकांचा उत्साह वाढवला.

नाट्याविष्कारातून माणसे घडविण्याचे काम’

एकांकिका किंवा नाटक फक्त कलाकार घडवत नाहीत, तर नाट्याविष्कार हा माणसे घडविण्याचे काम करतो. ही एक सांघिक कलाकृती असल्यामुळे कलाकारांसह प्रेक्षकांमध्येही एकोप्याची भावना निर्माण होते. हा कलाविष्कार उत्तमरित्या सादर करण्याच्या एका ध्येयाने सर्वजण एकजुटीने काम करीत असतात. कला ही माणसे जोडण्याचे, त्यांना आनंद देण्याचे आणि प्रवाही करण्याचे काम करते. कला माणसाला कोणत्याही बंधनात अडकवत नाही. कला तुमच्या शैक्षणिक पात्रतेविषयी आणि जात-धर्माविषयी कोणतेही प्रश्न तुम्हाला विचारत नाही. त्यामुळे ही कलेची सर्वात मोठी देणगी आहे. याठिकाणी तुम्ही माणूस म्हणून येता आणि माणूस म्हणूनच जाता, असे सुबोध भावे म्हणाले. ‘संगीत मानापमान’ या जुन्या संगीत नाटकावरून प्रेरित होऊन ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. विशेष बाब म्हणजे अभिनयासह दिग्दर्शन ही महत्त्वाची जबाबदारीही सुबोध भावे यांनी सांभाळली आहे. जिओ स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाच्या निमित्तानेही त्यांनी नाट्योत्सवातील उपस्थितांशी संवाद साधला.

प्रायोजक

● मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण

● सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर

● सहप्रायोजक : झी टॉकीज, केसरी टूर्स, भारती विद्यापीठ

● पॉवर्ड बाय : एन एल दालमिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च, फ्यूजनफ्लिक्स, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

● साहाय्य : अस्तित्व

● टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presentation of quality folk songs at the jnpa auditorium in uran mumbai news amy