मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून झोपडीधारकांच्या कागदपत्रांसह झोपु योजनांशी संबंधित सर्व कागदपत्रांचे डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येत आहे. वर्गीकरण करून कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यात येत असून झोपु प्राधिकरणाने आतापर्यंत दोन कोटी कागदपत्रांचे जतन केले आहे.
मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपु प्राधिकरणाकडून झोपु योजना राबविल्या जात आहेत. याअनुषंगाने झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करण्यासाठी झोपडीधारकांकडून विविध प्रकारची कागदपत्रे जमा केली जातात, त्याचवेळी झोपु योजनेशी संबंधित प्रस्तावासह अन्यही अनेक प्रकारची कागदपत्रे झोपु प्राधिकरणाकडे जमा केली जातात. अशा वेळी झोपु प्राधिकरणाकडे मोठ्या संख्येने फायली, कागदपत्रे जमा असून या फायली, कागदपत्रांचे जतन करण्याचे मोठे आव्हान झोपु प्राधिकरणासमोर आहे. हे आव्हान पेलण्यासाठी प्राधिकरणाने कागदमुक्त कारभार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्याच वेळी दुसरीकडे कागदपत्रांचे डिजिटल स्वरुपात जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कागदपत्रांचे स्कॅनिंग आणि वर्गीकरण केले जात आहे. यासाठी प्राधिकरणाने स्टाॅक होल्डींग काॅर्पोरेशन या कंपनीची नियुक्ती केली आहे. मागील काही महिन्यांपासून या कंपनीच्या माध्यमातून फायली, कागदपत्रांचे स्कॅनिंग करून डिजिटल स्वरुपात जतन केले जात असल्याची माहिती झोपु प्राधिकरणाकडून देण्यात आली.
जमा कागदपत्रांचे ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ असे वर्गीकरत करण्यात आले असून ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ वर्गीकरणातील कागदपत्रे स्टाॅक होल्डींग काॅर्पोरेशन कंपनीकडे डिजिटल स्वरूपातील जतनासाठी पाठवविण्यात येत आहेत. आतापर्यंत दोन कोटी कागदपत्रांचे जतन करण्यात आल्याची माहिती झोपु प्राधिकरणाने दिली. ‘ड’ वर्गातील कागदपत्रे काही निश्चित कालावधीसाठीच आवश्यक असतात. त्यामुळे तो कालावधी संपुष्टात आल्यानंतर ‘ड’ वर्गातील कागदपत्रे योग्य प्रकारे नष्ट केली जात आहेत. एकूणच कागदपत्रमुक्त कारभार आणि उपलब्ध कागदपत्रांचे योग्य ते जतन करण्यास प्राधिकरणाकडून प्राधान्य दिले जात आहे.