श्रीमंत बाजीराव पेशवे, त्यांची पहिली पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी यांची कथा सांगणाऱ्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटात बाजीरावांचे आणि पर्यायाने इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केले असल्याची सडकून टीका होत असताना आता या वादाच्या निमित्ताने खुद्द पेशव्यांचे आणि मस्तानीचे वंशज एकत्र आले आहेत. गेली अनेक वर्षे पेशवे आणि मस्तानी यांचे वंशज एकमेकांच्या संपर्कात आहेत, त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे आहे. या वादाच्या निमित्ताने त्यांच्या पिढय़ांचे एकत्रित असणे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
ऐतिहासिक नात्याने जोडली गेलेली ही दोन घराणी वर्तमानकाळात ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या निमित्ताने मुंबईत पहिल्यांदाच एका पत्रकार परिषदेत जाहीरपणे एकत्र आली. यानिमित्ताने या दोन घराण्यांमधील सध्याचे पिढीचे धागेदोरेही पहिल्यांदाच उलगडले.
‘‘मस्तानीचे वंशज मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण इंदोरमध्ये स्थायिक आहेत. पुण्यात उमर अली बहाद्दर म्हणून त्यांचे वंशज होते. सध्या सर्वसामान्यांप्रमाणे नोकरी-व्यवसाय करणारी ही मंडळी आहेत,’’ असे इतिहास संशोधक मंदार लवाटे यांनी सांगितले. शनिवारवाडय़ासमोर बाजीरावांच्या पुतळ्यांचे अनावरण झाले तेव्हाही हे सगळे जण तिथे एकत्र आले होते. इंदूरमध्ये बाजीरावांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम केले जातात. त्यांच्याचबरोबर पेशव्यांच्या सरसेनापती उमाबाईसाहेब खांडेराव दाभाडे यांचे वंशज तळेगावचे सरदार सत्यशीलराजे दाभाडे, पेशव्यांचे सरदार पिलाजीराव जाधव यांच्या सूनबाई अशी सरदार घराणीही एकत्र जोडलेली आहेत. ही मंडळी या चित्रपटाबद्दल नाखूश असून त्याविरुद्ध एकत्र आले आहेत. आपल्या घराण्याच्या इतिहासाबद्दल त्यांच्या आजच्या पिढीमध्ये अभिमान आहे. आपला इतिहास अभ्यासून पाहण्याची उत्सुकता आहे हे महत्त्वाचे वाटते, असे लवाटे यांनी सांगितले.
‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाचे प्रोमोज, त्याची गाणी पाहिल्यानंतर या दोन्ही कुटुंबांमध्ये आपापसात चर्चा सुरू झाली होती. मस्तानीचे वंशज असलेले अवेस नवाब बहाद्दूर साब यांनी इंदूरमध्ये पत्रकार परिषद घेतलीच, शिवाय उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या चित्रपटातून विपरीत इतिहास लोकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी चित्रपट प्रथम आम्हाला दाखवला जावा, अशी मागणी उदयसिंह पेशवे यांच्याबरोबर इंदोरमध्ये वास्तव्यास असलेले बहाद्दूर साब यांनी एकत्रितरीत्या केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा