गेल्या वर्षी लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यानंतर केवळ वर्षभरातच मंत्रालय कसे सावरले आहे, हे दाखवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला जातानाच काही पत्रकारांना मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये भयावह परिस्थितीचा सामना करावा लागला. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील क्रमांक दोनची लिफ्ट वर जाताना तळ आणि पहिला या दोन मजल्यांदरम्यान बंद पडली. त्यामुळे आत असलेल्या पत्रकारांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याचा जीवही टांगणीला लागला होता. अखेर मंत्रालयाच्या देखभाल विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने ही लिफ्ट तळ मजल्यावर आणून आतील लोकांची सुटका केली. आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रालय कसे सक्षम आहे, याचा डंका पिटण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘हात दाखवून अवलक्षण’ करून घेतले.
मंत्रालयात चालू असलेल्या दुरुस्ती आणि नुतनीकरणाच्या कामाची माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्यामलकुमार मुखर्जी यांनी शुक्रवारी पत्रकारांना आमंत्रित केले होते. मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर चाललेले काम पत्रकारांना प्रत्यक्षात दाखवून त्याबाबत माहिती देण्यात येणार होती. दुपारी दोनच्या सुमारास सात-आठ पत्रकारांचा घोळका या कार्यक्रमाला जाण्यासाठी मुख्य इमारतीतील क्रमांक दोनच्या लिफ्टमध्ये शिरला. त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक अधिकारीही होता. बारा जणांची क्षमता असलेल्या या लिफ्टमध्ये केवळ दहा लोक होते तरीही लिफ्ट तळ मजला आणि पहिला मजला यांमध्ये बंद पडली. मात्र लिफ्टमनने हरप्रकारे प्रयत्न करूनही लिफ्ट सुरू होण्याचे नावच घेत नव्हती.
अखेर लिफ्टमनने लिफ्टमधील इंटरकॉमवरून मंत्रालयाच्या देखभाल विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर थोडय़ाच वेळात या कर्मचाऱ्यांनी ही लिफ्ट पुन्हा तळ मजल्यावर आणण्यात यश मिळवले.

Story img Loader