मुंबई : नाविन्यपूर्ण कल्पना-उपक्रम, गुणवत्ता आणि गतिमान अंमलबजावणी हे प्रभावी प्रशासकीय कारभाराचे प्रमुख घटक असून या तिन्हींचा वापर करून अधिकारी चांगले काम करू शकतात. असे वेगळे आणि चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचे कौतुक झाल्यास त्याचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल, असे प्रतिपादन सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले.
राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या ‘अरुण बोंगीरवार पब्लिक सर्विस एक्सलन्स अॅवॉर्डस २०२१’ प्रदान सोहळय़ात सुजाता सौनिक बोलत होत्या़
पुण्यातील करोना व्यवस्थापनासाठी राबवलेल्या प्रभावी यंत्रणेबद्दल भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रुबल अगरवाल आणि गडचिरोलीतील आदिवासींना सरकारी योजनांचे लाभ देण्यासाठी राबवलेल्या एक खिडकी योजनेबद्दल भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी व गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशदाचे महासंचालक एस. चोक्किलगम, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, अरुण बोंगीरवार फाउंडेशनच्या अध्यक्ष लता बोंगिरवार, निवृत्त सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लता बोंगीरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सनदी अधिकारी पियुष बोंगीरवार यांनी केले.
प्रशासकीय सेवेतील अधिकारी होण्याची अनेकांची आकांक्षा असत़े मात्र खूप कमी लोकांना ते भाग्य मिळते. अधिकारी झाल्यानंतर पहिल्या दहा वर्षांत ज्यांना आपण वेगळेपणाने कसे काम करू शकतो हे समजते ते चांगले अधिकारी होतात. अरुण बोंगीरवार हे महाराष्ट्रातील असेच एक नावाजलेले अधिकारी होत़े कारकीर्दीच्या सुरुवातीला मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. प्रशासकीय सेवेतील अधिकारी ठिकाणी चांगले काम करत असले तरी त्यांच्या कामाची दखल खूप कमी घेतली जाते. चांगल्या अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक झाल्यास प्रशासकीय कामकाज चांगले होण्यात मदत होईल, असे सौनिक यांनी सांगितल़े
करोनाच्या सुरूवातीच्या काळात वेगवेगळय़ा मार्गदर्शक सूचना येत होत्या. त्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन यंत्रणा उभारण्याचे आम्ही ठरवले. आपत्ती निवारण यंत्रणेच्या कक्षाचे रूपांतर आम्ही करोना व्यवस्थापनाच्या वॉर रूममध्ये केले. चाचणी, रुग्णांचा शोध व उपचार या त्रिसूत्रीला आम्ही प्रशिक्षण, संघ भावनेने काम आणि तंत्रज्ञानाचा वापर या त्रिसूत्रीची जोड दिली व त्यामुळे पुण्यासारख्या महानगरात कोविड व्यवस्थापन चांगल्या रीतीने करता आले. या पुरस्कारामुळे मनोधैर्य वाढले आहे आणि चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे, अशी भावना रुबल अग्रवाल यांनी व्यक्त केली.
गडचिरोली हा दुर्गम भाग आहे. तेथील अनेक तालुक्यांमध्ये दळणवळणाची साधने ही खूप अपुरी आहेत. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ नीट पोहोचत नाही. त्यातून सरकार आणि आदिवासी यांच्यात संवाद आणि समन्वयाचा अभाव तयार झाला आहे. ती दरी दूर करण्यासाठी व सरकार आणि आदिवासी यांच्यात एक सेतू म्हणून काम करण्यासाठी आम्ही ‘पोलीस दादालोरा खिडकी’ म्हणजे एक खिडकी योजना राबवली. त्यातून जात प्रमाणपत्रांसह विविध सरकारी प्रमाणपत्रे-कागदपत्रे आदिवासींना दिली. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यासारख्या विविध योजनांचे लाभ आदिवासींना मिळवून दिले. वर्षभरात जवळपास एक लाख नऊ हजार आदिवासींना आम्ही या एक खिडकी योजनेचा लाभ देऊ शकलो. त्यातून सरकारबद्दल आदिवासींची भावना बदलत आहे. नक्षलवादाकडे ओढा कमी होत आहे, असे सांगत अंकित गोयल यांनी पुरस्काराबद्दल आभार मानले. पुढच्या टप्प्यात आदिवासी महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून तेथे रोजगार आणि उत्पन्नाची साधने तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे गोयल म्हणाले.
महाराष्ट्राच्या प्रगतीत राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही योगदान आहे. अशा चांगल्या अधिकाऱ्यांना शोधून पुरस्कार देणे हा चांगला उपक्रम आहे, असे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर म्हणाले.
पुरस्कारांची संख्या वाढविण्याची ग्वाही
बोंगीरवार फाउंडेशनने पुढील वर्षी केवळ दोन अधिकाऱ्यांना पुरस्कार न देता पुरस्कारांची संख्या वाढवावी, अशी सूचना सुजाता सौनिक यांनी केली. बोंगीरवार फाऊंडेशनचे प्रवीणसिंह परदेशी यांनी या सूचनेचे स्वागत करत पुढील वर्षी पुरस्कारांची संख्या वाढवण्याचे जाहीर केले.