मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नव्या मेट्रोमुळे अंधेरी ते दहिसर पूर्व-पश्चिम परिसरातील घरांच्या किमतीत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. गेले काही वर्षे विकल्या न गेलेल्या घरांनाही आता खरेदीदार मिळू लागला आहे. वर्षभरात घरांच्या किमतीत पाच ते दहा टक्के इतकी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात विकल्या गेलेल्या एकूण सव्वा लाख घरांपैकी अर्धी घरे पश्चिम उपनगरात विकली गेली आहेत.

वर्सोवा- घाटकोपर ही मेट्रो सेवा जून २०१४ मध्ये कार्यान्वित झाली तर मेट्रो दोन-अ आणि सात या मेट्रो मार्गाचे काम ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरू झाले. मात्र वर्सोवा-घाटकोपर सेवेला झालेला अतिविलंब पाहता नवी मेट्रो प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होईल, याबाबत ठामपणे सांगितले जात नव्हते. या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र या परिसरातील कमालीची वाहतूक कोंडी लक्षात घेता या घरांना फारशी मागणी नव्हती. मात्र मेट्रोसेवेचे काम जोरात सुरु झाल्यानंतर या परिसरातील घरांची मागणी वाढू लागली. ही सेवा प्रत्यक्षात सुरु होण्याची चिन्हे दिसू लागताच विकासकांनीही त्याचा फायदा उठविला. आतापर्यंत घरांचे जे दर होते त्यात पाच ते दहा टक्के वाढ केली. त्यानंतरही घरांची विक्री वाढू लागली. आता अनेक गृहप्रकल्प या परिसरात उभे राहत असून या प्रकल्पातील घरांच्या किमतीत वाढ झाली आहे.

अंधेरी ते दहिसर या पट्टय़ात जागांचे दर २० हजार ते ५० हजार प्रति चौरस फूट होते. आता ते दर २० हजार ते ७०-८० हजार प्रति चौरस फूट झाले आहेत. एका रिएल इस्टेट एजंटने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेकडील दर २५ ते ३५ हजार प्रति चौरस फूट होता. तो दर आता ३० ते ४० हजार चौरस फूट झाला आहे. बोरिवलीतील २० ते २२ हजार प्रति चौरस दर आता २८ ते ३२ हजार रुपये प्रति चौरस फूट इतका झाल्याचा दावा केला जात आहे.

घरांच्या किमतीत झालेली सरासरी वाढ (टक्क्यांमध्ये)

अंधेरी पश्चिम- ४३, कांदिवली पूर्व- १३.४, मालाड पश्चिम- १८.१, बोरिवली पश्चिम- ११.५, गोरेगाव पूर्व- ४८.६, कांदिवली पश्चिम- ३५.६, गोरेगाव पश्चिम- ३.९, बोरिवली पूर्व- २७.६, जोगेश्वरी पूर्व- ३२.१, दहिसर- ६२ (एकेकाळी घरांच्या किमतीत आघाडीवर असलेल्या लोखंडवाला संकुल, ओशिवरा, चिकूवाडी (बोरिवली पश्चिम) या परिसरातील घरांच्या किमतीत कमालीची घसरण झाल्याचे आढळते.)

(मकान डॉट कॉम संकेतस्थळावरील माहितीनुसार)