पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोक्का कोर्टातून शुक्रवारी पळालेला दहशतवादी अफझल उस्मानी याला पकडण्यासाठी अजूनही यश आले नसल्याने त्याची माहिती देणाऱ्यास रोख इनाम देण्याची घोषणा महाराष्ट्र पोलीस लवकरच करणार आहेत.
इंडियन मुजाहिदीनचा सदस्य असलेल्या उस्मानीला शोधण्यासाठी देशभर प्रयत्न करूनही पोलिसांच्या हाती कोणताही दुवा लागलेला नाही. पुढच्या काही दिवसांत उस्मानीला पकडण्यात यश आले नाही तर त्याची माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस जाहीर केले जाईल. मात्र बक्षिसाची रक्कम ठरवण्यात आलेली नाही. उस्मानी नेपाळमध्ये पळण्याची शक्यता लक्षात घेऊन बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, सिक्कीम तसेच पश्चिम बंगालच्या पोलीस दलालाही सतर्क करण्यात आले असून उस्मानीचे छायाचित्र सर्वत्र पाठवण्यात आले आहे.
उस्मानीचे घर असलेल्या उत्तर प्रदेश तसेच शेजारच्या बिहारमध्येही पोलिसांची पथके पाठवण्यात आली आहेत. उस्मानीने या दोन्ही राज्यांमध्ये चांगले जाळे उभारले आहे. उस्मानीचे दाढीधारी तसेच दाढी नसलेले छायाचित्र, त्याची माहिती, लपण्याच्या संभाव्य जागा, बोटांचे ठसे त्याचप्रमाणे त्याच्या नातेवाइकांची, मित्रांची व शेजाऱ्यांची माहिती आंध्र प्रदेश, कर्नाटक व इतर शेजारच्या राज्यांमध्ये तसेच ठाणे, पुणे, वाशी, औरंगाबादमधील पोलिसांना पाठवण्यात आली आहे.
मोक्का कोर्टात हजर करण्यात आलेला उस्मानी शुक्रवारी पळून गेला. याप्रकरणी साहाय्यक उपनिरीक्षक संजय देशमुख आणि साहाय्यक निरीक्षक राम चोपडे यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार न्यायालयातून पळाल्यावर भावाच्या मित्राला भेटून उस्मानीने त्याच्याकडून ७०० रुपये घेतले होते. दहशतवादविरोधी पथकाकडून पैसे देणाऱ्या माणसाची चौकशी करण्यात येत आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा