पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे दोन दिवसांच्या भेटीसाठी उद्या सपत्निक मुंबईत दाखल होत आहेत. या दौऱ्यात ते एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटला भेट देणार असून तेथील एका नव्या सुविधा केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. त्याशिवाय एका खाजगी कार्यक्रमासही ते उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी रात्री पंतप्रधानांचा मुक्काम येथील राज भवनावर असेल, रविवारी सकाळी ते दिल्लीला रवाना होतील, असे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधानांच्या मुंबई भेटीतील कार्यक्रमांदरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही त्यांच्यासोबत असतील. मात्र, राज्यातील विशिष्ट बाबींसदर्भात कोणत्याही विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलेले नाही, असेही सांगण्यात आले.  या भेटीत सिंचन प्रकल्पांचा मुद्दा, केंद्राच्या निधीअभावी रखडलेले सिंचन प्रकल्प, मुंबईच्या पायाभूत सुविधा उभारणीची प्रगती, तसेच इंदू मिलच्या जागेतील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या उभारणी आदी बाबी मुख्यमंत्री चव्हाण हे पंतप्रधानांसमोर मांडतील, असे या सूत्रांना वाटते. इंदू मिलच्या जागेत आंबेडकर स्मारकाच्या उभारणीबाबत आजवर अनेक आश्वासने दिली गेली, चर्चाही झाल्या आणि वेगवेगळ्या स्तरांवर बैठका झाल्या, पण आता ठोस कृती करा अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना पंतप्रधानांच्या मुंबई भेटीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.     

Story img Loader