मुंबई : ‘मेट्रो २ अ’ (दहिसर – डीएन नगर) मार्गिकेतील डहाणूकरवाडी – अंधेरी पश्चिम आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेतील गोरेगाव – गुंदवली या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या मार्गिकांच्या लोकार्पणाची जय्यत तयारी करीत आहे. याला महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी बुधवारी दुजोरा दिला.
दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यास पश्चिम द्रुतगती मार्गावरील, पश्चिम उपनगरातील प्रवास सुकर आणि सुसाट होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गिका सुरू होणे ही मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बाब असणार आहे.मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी १४ मेट्रो मार्गिकांचे ३३७ किमी लांबीचे जाळे विणले जात आहे. यात ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांचा समावेश आहे. या मार्गिकांतील दहिसर- डहाणूकरवाडी- आरे असा २० किमी लांबीचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला, तर दुसरा टप्पा ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र यात विलंब झाला असून मुंबईकरांची थेट मेट्रो प्रवासाची प्रतीक्षा लांबली होती. पण आता मात्र काम आणि मेट्रोच्या सुरक्षा चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. त्यानुसार दोन-तीन दिवसांत मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर पुढील आठवडय़ात, १९ जानेवारी रोजी दुसरा टप्पा सुरू होईल. या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल, असे श्रीनिवास यांनी सांगितले.