उद्यापासून दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावणार; मुंबईकरांना प्रवासासाठी रेल्वे, बेस्टबरोबर आणखी एक पर्याय
मेट्रोने दहिसर ते अंधेरी प्रवास केवळ ३५ मिनिटात करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न अखेर पूर्ण होत आहे. मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर) मार्गिकेतील वळनई ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व) मार्गिकेतील गोरेगाव पूर्व ते गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित गुंदवली मेट्रो स्थानक येथे लोकार्पणाचा सोहळा होणार आहे. तर लोकार्पणानंतर शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून मेट्रो २ अ आणि ७ मेट्रो पूर्ण क्षमतेने धावणार आहे.
या मेट्रो मार्गिकेमुळे दहिसर ते अंधेरी प्रवास सुकर आणि अतिजलद होणार आहे. पण त्याहीपेक्षा म्हत्त्वाचे म्हणजे मेट्रो १ (घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ अशा तीन मार्गिका एकमेकांशी जोडल्या जाणार असल्याने पूर्व आणि पश्चिम उपनगर प्रवास करणे शक्य होणार आहे. तर आता रेल्वे, बेस्टनंतर मेट्रोचे ही जाळे तयार होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.मेट्रो २ अ मधील दहिसर ते डहाणूकरवाडी आणि मेट्रो ७ मधील दहिसर ते आरे असा पहिला टप्पा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) एप्रिल २०२२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात झाला आहे. आता गुरुवारी दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर शुक्रवारपासून मेट्रो २ अ दहिसर ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो ७ दहिसर ते गुंदवली अशी थेट धावणार आहे.
पंतप्रधान मेट्रो प्रवास करणार
मेट्रो ७ मधील गुंदवली मेट्रो स्थानकावर लोकार्पणाचा सोहळा होणार आहे. यावेळी पंतप्रधान गुंदवली ते मोगरा मेट्रो स्थानक असा मेट्रो प्रवास करणार आहेत.
एकात्मिक तिकीट प्रणाली आणि मुंबई १ ॲपचेही लोकार्पण
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेतील दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाबरोबरच यावेळी एमएमआरडीएकडून विकसित करण्यात आलेल्या एकात्मिक तिकीट प्रणालीचे (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत. तर प्रवाशांच्या सोयीसाठी ई – तिकिटाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएने ‘मुंबई १’ नावाचे एक ॲप तयार केले आहे. या ॲपचेही लोकार्पण यावेळी होणार असल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.
तृप्ती शेट्ये करणार सारथ्य
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाच्या सोहळ्याच्या वेळी (एप्रिल २०२२) ज्या महिला मेट्रो पायलटने मेट्रोचे सारथ्य केले होते तीच महिला पायलट गुरुवारीही मेट्रोचे सारथ्य करणार आहे. त्यावेळी तृप्ती शेट्ये यांनी आरे ते कुरार आणि कुरार ते आरे अशी पहिली मेट्रो चालविण्याचा मान मिळवला होता. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मेट्रोतून प्रवास केला होता. उद्धव ठाकरे यांनी तृप्ती शेट्येशी संवाद साधला होता. आता हीच महिला मेट्रो पायलट गुरुवारी मेट्रोचे सारथ्य करणार असून यावेळी मेट्रोत पंतप्रधान असणार आहेत.
दुसऱ्यांदा लोकार्पण सोहळ्यात मेट्रोचे सारथ्य करण्याची संधी मिळत आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत गाडी चालवायची आहे. त्यामुळे एक दडपण आणि उत्सुकताही आहे, असे तृप्ती शेट्येने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
तिन्ही मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यात मेट्रो चालविण्याचा मान महिला मेट्रो पायलटला मिळाला आहे. ‘मेट्रो १’वरील पहिली मेट्रो रुपाली चव्हाण हिने चालवली होती. त्यानंतर ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या पहिल्या टप्प्यातील पहिली मेट्रो तृप्ती शेट्येने चालवली होती. आता दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यातही पहिली मेट्रो तृप्ती शेट्ये चालविणार आहे.