मुंबई : विधानसभेत मिळालेल्या महाविजयानंतर पहिल्यांदाच महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पुन्हा पुन्हा निवडून कसे यायचे’, ‘मतदारसंघांत कामे कशी करायची’ यावर गुरुमंत्र दिला. हा गुरुमंत्र ‘गोपनीय’ राहावा, यासाठी बैठकीत आमदारांना मोबाइल नेण्यासही मज्जाव करण्यात आला. खुद्द पंतप्रधानांनी ‘बैठकीतील काहीही बाहेर जाता कामा नये’ असे बजावूनदेखील शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदारांनी मोदींचा मंत्र माध्यमांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवला.
नौदल दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान मुंबईत आले असल्याने महायुतीच्या आमदारांबरोबर त्यांची बैठक कुलाब्यातील ‘आयएनएस’ आंग्रे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधानांनी आमदारांबरोबर भोजनही केले. मात्र, या कार्यक्रमासाठी आमदारांना त्यांचे मोबाइल नेण्यास मज्जाव करण्यात आला होता. सर्व आमदारांना सकाळी ९ वाजता विधान भवनाच्या प्रांगणात उपस्थित राहण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. तेथे मंत्री व आमदारांसाठी नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी विधान भवनाच्या प्रांगणात खास शामियाना उभारण्यात आला होता. तेथून वातानुकूलित बसने सर्वांना बैठकस्थळी नेण्यात आले. बसमध्ये आमदारांची बैठकव्यवस्थाही ठरवण्यात आली होती आणि त्यानुसारच बसण्याची सर्व आमदारांना सूचना करण्यात आली होती. सकाळी दहाच्या सुमारास सभागृहात आमदारांना बसवण्यात आले. त्यानंतर मोदींनी आमदारांची जणू शाळाच घेतली. या वेळी व्यासपीठावर फक्त चौघे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोघे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे?.
मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आलेले आणि राजकीय जीवनातील काही अनुभव सांगून बोलण्यास सुरुवात केली. आमदारांनाही आपले मुद्दे मांडण्यास सांगितले. लाडकी बहीणसारख्या सर्व महत्त्वाच्या शासकीय योजनांचे लाभ तळागाळापर्यंत कसे पोचतील, याकडे आमदारांनी आपल्या मतदारसंघात काटेकोरपणे लक्ष ठेवण्याच्या सूचना मोदी यांनी सार्वजनिक जीवनात वावरताना वैयक्तिक चारित्र्य किंवा वर्तन योग्य असावे, जनमानसात आपली प्रतिमा चांगली राहील, याची काळजी घ्यावी. लोकप्रतिनिधी सार्वजनिकरीत्या कसे वागतात, याकडे जनतेचे लक्ष असते, असे सांगून मोदी यांनी एका बड्या नेत्याने अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत बोलल्याचा प्रसंग व अन्य काही अनुभव सांगितले. शासकीय कर्मचाऱ्यांशी आपले वर्तन योग्यच असले पाहिजे व त्यांच्याशी चांगला संवाद ठेवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. राजकीय जीवनात कसे काम करावे आणि पुन्हा निवडून येता यावे, यासाठी कोणती काळजी घ्यावी, आदी मुद्द्यांवर मोदी यांनी मार्गदर्शन केले.
आपण केलेले भाषण बाहेर माध्यमांमध्ये जाता कामा नये, असे मोदींनी आमदारांना बजावले. त्यामुळे बैठकीतून बाहेर पडल्यानंतर भाजपच्या आमदारांनी अजिबात भाष्य केले नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी अतिशय उत्साहात माध्यमांपुढे बैठकीचा तपशील मांडला.
धनंजय मुंडे, भुजबळ अनुपस्थित
मोदींच्या या संवाद कार्यक्रमाला सध्या वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे उपस्थित नव्हते. मुंडे परळीत गेल्याने उपस्थित राहू शकले नाहीत, असे राष्ट्रवादीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मुंडे यांनी उपस्थित राहू नये, अशा काही सूचना भाजपकडून देण्यात आल्या होत्या का, हे मात्र समजू शकले नाही. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, प्रकाश सोळंखे आदी राष्ट्रवादीचे आमदारही उपस्थित नव्हते. या सर्व आमदारांनी अजित पवारांची पूर्वपरवानगी घेतली होती, असेही सांगण्यात आले. शिवसेनेचेही सर्व आमदार उपस्थित नव्हते.
‘मोबाइलचा वापर कमी करा’
‘अनेक आमदार कामकाज करण्यासाठी मोबाइलचा अतिवापर करतात. मी पंतप्रधान असूनही मोबाइलचा वापर अतिशय कमी करतो, पण माझी सर्व कामे होतात. त्यापेक्षा कार्यकर्ते व इतरांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर अधिक भर द्यावा. काही कार्यकर्ते एकमेकांविरोधात तक्रारी करतात. तेव्हा त्यांना समोरासमोर बसवून चर्चा करावी व कान भरणाऱ्यांपासून दूर राहावे.’ असे मोदी यांनी आमदारांना बजावले.
हेही वाचा…यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड जाणून घ्या, देशातील रब्बी पेरण्यांची स्थिती, लागवड क्षेत्र
कुटुंबाला वेळ द्या
आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना प्रवास करावा लागतो, वेळी-अवेळी बाहेर राहावे लागते. पण रोजच्या धकाधकीच्या कामकाजातही आरोग्य चांगले राखण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी सांभाळून योग्य ती काळजी घ्यावी. जेवणावळी कमी करून योगासने व व्यायाम करावा, असा कानमंत्रही मोदी यांनी दिला. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ देतानाच आपल्या कुटुंबीयांसाठीही काही वेळ अवश्य द्यावा आणि वर्षभरातून काही वेळा फिरायलाही जावे, असेही मोदी यांनी नमूद केले.