मुंबई : देशाच्या संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाने १.२५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून देश आता शंभरहून अधिक देशांत संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे, तर पाच हजारांहून अधिक घटकांची आयात करण्याची आवश्यकता आता भासत नाही. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेमुळे भारत जगातील एक प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयास येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारतीय बनावटीच्या युद्धनौकांच्या लोकार्पण सोहळ्यात केले.
आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी या दोन युद्धनौका आणि आयएनएस वागशीर या पाणबुडीचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, नौदलप्रमुख दिनेश त्रिपाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नवल समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पेरी एरिक पॉमलेट आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>> १०० कोटींच्या फसवणुकीबद्दल तक्रार ‘मनीएज’च्या दोन संचालकांना अटक; ‘टोरेस’नंतर आणखी एक घोटाळा
भारत विस्तारवादाच्या नव्हे तर विकासाच्या भावनेतून कार्य करतो. हिंद – प्रशांत क्षेत्रात मुक्त, सुरक्षित वातावरण आणि शांतता हा भारताचा उद्देश आहे. किनारी भूप्रदेश असलेल्या राष्ट्रांच्या विकासाचा मुद्दा विचार करता SAGAR (क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षितता आणि वाढ) हा मूलमंत्र भारताने अवलंबला आहे.
देशाचे आर्थिक सहकार्य वाढले
हिंदी महासागर क्षेत्रातील त्वरित प्रतिसाद देणारा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांत भारतीय नौदलाने शेकडो जीव तर वाचवलेच शिवाय हजारो कोटी रुपये किमतीची आंतरराष्ट्रीय मालमत्ता वाचवली आहे. यामुळे भारताच्या नौदल व तटरक्षक दलाची विश्वासार्हता वाढली आहे. भारताच्या हिंदी महासागरातील प्रभावामुळे आशिया खंडातील देशांबरोबरच ऑस्ट्रेलिया, आखाती देश व आफ्रिकन देश आणि भारतातील आर्थिक सहकार्य वाढत असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
रोजगारनिर्मितीत वाढ
कर्नाटकात सशस्त्र सेनादलांसाठी विमान निर्मिती कारखाना सुरू झाला असून देशातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर कारखान्याचे काम सुरू आहे. उत्तर प्रदेश व तमिळनाडूत संरक्षण मार्गिका विकसित करण्यात आल्या आहेत. तेथे संरक्षणविषयक उत्पादनांची निर्मिती होते. गेल्या दशकात भारतीय नौदलात सामील झालेल्या ७ पाणबुड्या व ३३ जहाजे अशी एकूण ३९ जहाजे भारतात तयार करण्यात आली आहेत. सध्या देशात ६० मोठ्या जहाजांची बांधणी सुरू असून त्यांची किंमत १.५ लाख कोटी रुपये आहे. या गुंतवणुकीमुळे ३ लाख रुपये कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती सहा पटीने वाढण्यास मदत होईल. या जहाजांच्या बांधणीतील बहुतेक सुटे भाग देशातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्याोगांकडून पुरवले जात आहेत. जहाजबांधणीच्या कामात जर २ हजार कामगार कार्यरत असतील, तर त्यामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांत १२ हजार रोजगारांची निर्मिती होऊ शकते.
वसाहतवादी प्रतीकांपासून मुक्तता
आपल्या ध्वजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली परंपरेची जोड देण्यासोबतच अॅडमिरल पदाच्या गणवेशावरील पदकांवर कोरण्यात येणाऱ्या चिन्हांची त्यानुसार फेररचना करण्यात भारतीय नौदलाने आघाडी घेतली आहे. भारताची वसाहतवादी राजवटीच्या प्रतीकांपासून मुक्तता झाल्याचे हे प्रतीक आहे, असे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले.